Ganesh Visarjan 2025 : राज्यभरातून लाडक्या गणरायाला निरोप!

Ganesh Visarjan 2025 – राज्यभरात आपल्या लाडक्या गणरायाला ढोल ताशाच्या गजरात निरोप देण्यासाठी गणेश भक्त सज्ज झाले होते. अनेक ठिकाणी श्रीगणेशाचें विसर्जन देखील करण्यात आले. तर काही ठिकाणी रविवार सकाळपर्यंत ठीक ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. या प्रसंगी आपल्या लाडक्या गणरायाच्या निरोपाने भक्त भावुक झाले होते .
मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी गणेश भक्तांचा महापूर लोटला होता. मोठ्या सार्वजनिक मंडळाचे गणपती विसर्जनासाठी चौपाटीवर दाखल झाले होते. गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या …अशा घोषणा होत होत्या.
यावेळी विसर्जनस्थळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण जुहू समुद्रकिना-यावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन कॅमे-यांद्वारे लक्ष ठेवले जात आहे. भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी मोठ्या संख्येने बीएमसी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी जीवरक्षकांचे पथक देखील तैनात करण्यात आले आहे. राज्यभरात भक्तांकडून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.
दरम्यान दुसरीकडे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मिरज नगरी गणरायाच्या जय घोषाने दुमदुमून गेली होती. अनंत चतुर्थीच्या दिवशी भव्य दिव्य मिरवणुकीने गणेश विसर्जन करण्याची मिरजेची परंपरा आहे, पारंपारिक वाद्य आणि डिजेच्या तालावर सळपासूनच मिरवणुकीला सुरुवात झाली होती.
जालना शहरात देखील उत्साह पाहायला मिळत आहे. जालना शहरातल्या मानाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. यावेळी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांच्या पत्नी सीमा खोतकर यांच्या हस्ते गणपतीची आरती संपन्न झाली, त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली होती.





