काश्मिरी मुलांच्या हस्ते गणेश प्रतिष्ठापना, आरती

पुणे -पुणे-काश्मीर सांस्कृतिक मंचातर्फे सरदार विंचूरकर वाड्यात काश्मिरी पंडित आणि काश्मिरी मुलांच्या हस्ते गणेश प्रतिष्ठापना आणि आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पंडित वसंतराव गाडगीळ, सरदार विंचुरकरांचे दहावे वंशज नारायणराव विंचुरकर, जनरल जोरावर सिंग यांचे वंशज देवेंद्र सिंग आणि दीक्षा कलुजिया, श्याम देशपांडे, गजानन थरकुडे, हेमंत जाधव, पराग ठाकूर आदी उपस्थित होते.
“आम्ही नेहमी पुण्यातील आमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर गणेशोत्सव साजरा करायचो. पुढच्या वर्षी आम्ही काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा करणार याचा खूप आनंद आहे. कलम 370 रद्द झाल्यामुळे सरकारचे अभिनंदन. आता काश्मीरचा विकास होईल आणि काश्मिरी विद्यार्थ्यांना तिथेच नोकरी देखील मिळेल, अशा भावना काश्मिरी विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या. तर, “लोकमान्य टिळकांनी याच वाड्यातून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. येथे आपण सगळे उत्सव साजरा करत आहोत. आपल्या सगळ्यांना काश्मीरला सुखी आणि विकसित झालेले पाहायचे आहे,’ असे महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या.





