सुरक्षेबाबत काळजी घेण्याचे आवाहन
पुणे – सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना सवलतीचा व वहन आकारासह 4 रुपये 55 पैसे प्रतियुनिट दराने तात्पुरती वीजजोडणी देण्यात येत असून मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी, तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वीजभार 0.5 किलोव्हॅटसाठी 1 हजार रुपये वीजजोडणी खर्च आकारण्यात येईल. मंडळाच्या वीजभारानुसार सुरक्षा ठेव रक्कम आकारण्यात येईल. उत्सवानंतर ही रक्कम मंडळाच्या खात्यात परतावा करण्यात येईल. मंडळाने सुरक्षिततेच्या जबाबदारीबाबत स्वत:चे प्रमाणपत्र (सेल्फ सर्टिफिकेशन), बॅंक खात्याची माहिती व मोबाइल क्रमांक द्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
टोल फ्री क्रमांक
देखावे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात. यासाठी गणेश मंडपातील वीजयंत्रणेची तपासणी करावी. तातडीच्या मदतीसाठी 24 तास सुरू असणाऱ्या टोल फ्री क्रमांक 1912 किंवा 1800-202-3435 किंवा 1800-233-3435 या क्रमांकावर संपर्क साधावा.
काय काळजी घ्यावी
– गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता आहे. पावसामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी गणेश मंडळांनी वीजयंत्रणेची योग्य काळजी घ्यावी
– मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी व नसल्यास त्वरित अर्थिंग करून घ्यावे.
– संबंधित क्षेत्रातील वीज अभियंत्यांचे मोबाइल क्रमांक नोंदवून ठेवावेत.
– लघुदाब, उच्चदाब वीजवाहिन्या, रोहित्रांचा देखाव्यांना स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी.