पुणे व्यापारी महासंघाचे गांधीगिरी पध्दतीने आंदोलन

पुणे – दुकानांची वेळ वाढवून द्यावी, यासाठी पुणे व्यापारी संघाने गांधीगिरी पध्दतीने आंदोलन केले आहे. शहरातील 10 हजारहून अधिक व्यापाऱ्यांनी दुकानाच्या चाव्या महासंघाकडे दिल्या.
या चाव्या शासनाकडे सुपूर्त करण्यासाठी व्यापारी महासंघाच्या शिष्ठमंडळाने शनिवारी (दि.7) अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे यांची भेट घेतली. परंतु, शिंदे यांनी चाव्या स्विकारण्यास नकार दिला.शहरातील दुकानाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
शहरातील करोनाचा पॉझिटीव्ह रेट कमी झाला आहे. मृत्यूदरही घटला आहे. मात्र, शहरातील निर्बध कायम ठेवल्यामुळे छोटे, मोठे व्यापारी त्रासले आहेत. त्यामुळे आता कारवाईची तमा न बाळगता त्यांनी शांततेने आंदोलन करण्यास सुरवात केली आहे. “पोलिसांशी आम्ही वाद घालणार नाही, पण व्यवसायासाठी दुकानेही बंद करणार नाही’ अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दुकाने सायंकाळी 7 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास सुरवात केली आहे.
इतक्या कमी वेळेत व्यवसाय करून त्यातून आयकर, जीएसटी, प्रॉपर्टी कर, वीजबिल, कर्जाचे हप्ते, दुकान व घरभाडे, कर्मचारी पगार, घरखर्च इत्यादी करणे अवघड जात आहे. हा खर्च शासनाने करून दाखवावा, असे आवाहन दहा हजार पेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी करत दुकानांच्या चाव्या प्रशासनाकडे सुपूर्त करण्यासाठी व्यापारी महासंघाच्या स्वाधीन केल्या. प्रशासकीयदृष्ट्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित जिल्हा हे तीनही वेगवेगळे घटक आहेत. मुंबईचा महापालिका हद्द असा विचार केला आहे.
परंतु, पुण्याचा मात्र शहर म्हणून विचार केला जात नाही. त्यामुळे हे अनोखे आंदोलन करण्यात आले. आता पालकमंत्रांच्या होणाऱ्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होईल अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. त्यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया, मनोज सारडा, नितीन काकडे, भरत शहा, सुरेश जेठवानी, अभय व्होरा, रवींद्र जोशी, प्रमोद शहा, मिलिंद शालघर आदी उपस्थित होते.





