Ganeshotsav 2023 : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचा गणपती बाप्पा ‘ओंकार’ महालात विराजमान

- जंगी मिरवणुकीने वाजत-गाजत आगमन
- विविध पथकांचा मिरवणुकीत उत्साही सहभाग
- गणपतीची छबी टिपण्यासाठी हजारो मोबाइलचे क्लिक
- श्री. व सौ. विजय घाटे यांच्या हस्ते विधीवत बाप्पाची प्रतिष्ठापना
पुणे – ढोल-ताशांचा गजर आणि सोबतीला मर्दानी खेळ आणि शंख नादाच्या निनादात पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या रथात हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या “श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’ च्या बाप्पाचे जंगी मिरवणुकीने वाजत-गाजत आगमन झाले. त्यानंतर विधीवत पूजा करून मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात भक्तीभावाने बाप्पांची “ओंकार महाला’त प्रतिष्ठापना करण्यात आली.
सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनातून रथातून बाप्पांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. रथासमोर पारंपरिक पांढऱ्या शुभ्र टोप्या परिधान केलेले श्रीराम पथक, अस्सल पुणेरी पोशाखातील आणि दरवर्षी मिरवणुकांचे आकर्षण ठरणारे मराठी चित्रपट अभिनेत्यांचा सहभाग असलेले कलावंत पथक, त्यापुढे गजर पथक, केशव शंखनाद पथक या सर्व पथकांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक आप्पा बळवंत चौक मार्गे बाजीराव रस्त्याने शनिवार वाड्यापासून “श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या ओंकार महालापर्यंत येथे पोहोचली. या गणपतीची छबी टिपण्यासाठी हजारो मोबाइलचे क्लिक पहायला मिळाले.
दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बाप्पाचे ओंकार महालात आगमन झाले. त्यानंतर ज्येष्ठ तबला वादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांच्या हस्ते सपत्नीक विधीवत बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन, ट्रस्टचे अन्य विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते. पुढील दहा दिवस ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच भक्तांसाठी आरोग्य शिबिराचेही आयोजन केल्याचे बालन यांनी सांगितले. दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते रात्री श्रींची पूजा आणि आरती करण्यात आली.
हिंदुस्थानातील पहिल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना पंडित विजय घाटे यांच्या हस्ते झाली. यावेळी आम्ही सर्वांनी देशभरातील दुष्काळाचे सावट दूर होऊन सर्वत्र भरपूर पाऊस पडावा, बळीराजा सुखी व्हावा आणि सगळीकडे सुख, समृद्धी आणि शांतता नांदावी, अशी प्रार्थना श्री बाप्पाच्या चरणी केली. – पुनीत बालन, विश्वस्त आणि उत्सव प्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
हिंदुस्थानातील पहिल्या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना आज माझ्या हस्ते झाली, हे मी माझे भाग्य समजतो. सर्वांना सुखी ठेवावे, अशी प्रार्थना मी बाप्पा चरणी केली आहे. – पद्मश्री विजय घाटे, तबला वादक





