तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज भारतीय तटरक्षक दलाच्या अलंकरण समारंभात भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांना शौर्य, विशिष्ट सेवा आणि गुणवंत सेवा पदके प्रदान केली. २०२२, २०२३ आणि २०२४ या वर्षांसाठी दिल्या गेलेल्या एकूण ३२ पदकांत ६ राष्ट्रपती तटरक्षक पदके ( विशिष्ट सेवा), ११ तटरक्षक सेवापदके (शौर्य पदके) आणि १५ तटरक्षक (गुणवंत सेवा) पदके कर्मचाऱ्यांना दिली गेली. ही पदके त्यांची अनुकरणीय सेवा, धाडसी कृत्य आणि कर्तव्यासाठी केलेले निःस्वार्थ समर्पण, यासाठी असून अनेकदा आव्हानात्मक आणि अत्यंत खडतर परिस्थितीत त्यांनी दाखवलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल दिली गेली आहेत.
भौगोलिकदृष्ट्या भारत तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे आणि त्याची किनारपट्टी विस्तीर्ण आहे. देशाच्या धोरणात्मक सुरक्षेला दोन प्रकारचे धोके आहेत. पहिला युद्धाचा धोका जो सशस्त्र दलांद्वारे हाताळला जातो आणि दुसरा म्हणजे चाचेगिरी, दहशतवाद, घुसखोरी, तस्करी आणि बेकायदेशीर मासेमारीची आव्हाने ज्यासाठी सागरी दल, विशेषत: भारतीय तटरक्षक दल नेहमीच सतर्क असतात. या आव्हानांचा सामना करण्यासाठी तटरक्षक दल सक्रियपणे काम करत आहे, धोरणात्मक सुरक्षा सुनिश्चित करण्यात या दलाची महत्वाची महत्त्वाचा भूमिका आहे, असे संरक्षणमंत्री यावेळी म्हणाले.
गेल्या एका वर्षात, तटरक्षक दलाने सागरी सुरक्षा, सुरक्षा आणि मानवतावादी मोहिमांमध्ये लक्षणीय कामगिरी केली आहे. सुमारे ३७ हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्याव्यतिरिक्त १४ बोटी आणि ११५ समुद्री चाच्यांना पकडले. याव्यतिरिक्त, तटरक्षक दलाने विविध बचाव कार्यांद्वारे १६९ लोकांचे प्राण वाचवले आणि २९ गंभीर जखमी लोकांना वैद्यकीय मदत मिळवून दिली होती.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे उभ्या ठाकणाऱ्या अपारंपरिक धोक्यांवर प्रकाश टाकत राजनाथ सिंह यांनी सागरी दलांना, विशेषत: तटरक्षक दलाला पारंपारिक धोक्यांसह सायबर हल्ले, डेटाचे उल्लंघन, सिग्नल जॅमिंग, रडार व्यत्यय आणि जीपीएसचे स्पूफिंग यांसारख्या आव्हानांपासून सावध राहण्याचे आवाहन केले.





