Gadre Marine-MSLTA ITF Tennis Tournament : भारताच्या लक्ष्मीसिरीला दुहेरी मुकुटाची संधी…

पुणे – डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड ३ कुमार १८ वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात लक्ष्मीसिरी दांडू हिने दुहेरी गटातील विजेतेपदाबरोबरच एकेरीत अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्य फेरीत मुलांच्या गटात पहिल्या सामन्यात भारताच्या अर्णव पापरकर याने दुसऱ्या मानांकित क्रिश त्यागीचा ३-६, ६-३, ६-३ असा तीन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना २ तास २० मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये क्रिशने सुरेख सुरुवात करत अर्णव विरुध्द हा सेट ६-३ असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या अर्णव जोरदार कमबॅक करत सातव्या गेममध्ये क्रिशची सर्व्हिस रोखली व हा सेट ६-३ असा जिंकून बरोबरी साधली.
तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये अर्णव याने आपला खेळ उंचावत पहिल्याच गेममध्ये क्रिशची सर्व्हिस रोखली. या सेटमध्ये वर्चस्व राखत अर्णव याने क्रिश विरुध्द हा सेट ६-३ असा जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. दुसऱ्या सामन्यात फ्रान्सच्या मोइस कौमेला पुढे चाल देण्यात आली. जपानच्या हिरोमासा कोयामाची तब्बेत बिघडल्यामुळे त्याने या स्पर्धेतून माघार घेतली.
मुलींच्या गटात अव्वल मानांकित भारताच्या माया राजेश्वरन रेवती हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत अकराव्या मानांकित कझाकस्तानच्या अरीना गोगुलीचा ६-३, ७-६(७-५) असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताच्या लक्ष्मीसिरी दांडू हिने इराणच्या दुसऱ्या मानांकित मांडेगर फरजामीचा २-६, ६-४, ६-२ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
दुहेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात क्रिश त्यागी व काहिर वारिक या दुसऱ्या मानांकित जोडीने हितेश चौहान व रेथिन सेंथिल कुमार यांचा ५-७, 6-4, १०-८असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात आयशी बिश्त व लक्ष्मीसिरी दांडू यांनी श्रीनिधी बालाजी व आर बासिरेड्डी -यांचा ६-४, ६-४ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील दुहेरीतील विजेत्या जोडीला एम व्ही देव करंडक व 75 आयटीएफ गुण, तर उपविजेत्या जोडीला करंडक व 45 आयटीएफ गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी डेव्हिस कप खेळाडू संदीप किर्तने, डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव अश्विन गिरमे आणि आयटीएफ सुपरवायझर लीना नागेशकर यांच्या हस्ते करण्यात आले.





