Maharashtra Election : गडचिरोलीमध्ये 111 वर्षांच्या आजीने बजावला मतदानाचा हक्क

गडचिरोली : आज संपूर्ण राज्यात मतदान पार पडत आहे. या मतदानाला लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. गडचिरोली जिल्ह्यात एका 111 वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी फुलमती बिनोद सरकार (वय 111) असे मतदान करणाऱ्या आजींचे नाव आहे.
फुलमती सरकार यांचा जन्म 1 जानेवारी 1913रोजी झाला. त्यांना चालता येत नसल्याने प्रशासनाने चारचाकी वाहन आणि व्हील चेअरची व्यवस्था केली होती. आजीने प्रत्यक्ष मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला. निवडणूक आयोगाने ८५ वर्षावरील मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती मात्र फुलमती सरकार या वृद्ध आजीने मतदान केंद्रावरच जाऊन प्रत्यक्ष मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्यांनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले.
प्रशासनाने फुलमती सरकार यांचे केले स्वागत
मतदान करण्यासाठी फुलमती सरकार या आजीला प्रशासनाने चारचाकी वाहनातून मतदान केंद्रावर आणले. त्यानंतर शालेय विद्यार्थी, गावकरी तसेच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फुलांचा वर्षाव करत त्यांचे मतदान केंद्रात स्वागत केले. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रशासनाच्या वतीने अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी फुलमती सरकार यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.





