लाखोंचे बक्षीस असलेल्या ‘त्या’ 2 जहाल नक्षलवाद्यांना अटक

गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. सरकारने बक्षीस जाहीर केलेल्या आणि एका निरपराध इसमाच्या खुनात सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना आज पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही नक्षलवाद्यांवर शासनाकडून १० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
कशी केली कारवाई?
गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज हद्दीतील जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथक प्राणहिताचे जवान माओवादविरोधी अभियान राबवित होते. दरम्यान त्यांना दोन संशयित व्यक्ती पोस्टे धोडराज हद्दीत घातपात करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे आढळून आले. त्यानंतर विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांनंतर त्यांची अधिक चौकशी केली असता, त्यांची नावे रवि मुरा पल्लो (वय 33 वर्षे, रा. कवंडे, तह. भामरागड, जि. गडचिरोली) हा ॲक्शन टिम कमांडर आणि दोबा कोरके वड्डे (वय 31 वर्षे रा. कवंडे, तह. भामरागड, जि. गडचिरोली) हा भामरागड दलमचा पार्टी सदस्य असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
कोण आहेत रवि मुरा पल्लो आणि दोबा कोरके वड्डे ?
रवि मुरा पल्लो हा 2016 पासून जनमिलिशीया पदावर भरती होऊन माओवाद्यांची कामे करित होता. त्याने 2018 पासून ॲक्शन टिम सदस्य म्हणून काम पहिले. तर 2022 मध्ये ॲक्शन टिम कमांडर म्हणून त्याने बढती मिळवत आतापर्यंत त्यांच पदावर दलममध्ये कार्यरत होता. तर या कार्यकाळात त्याने आजपर्यंत एकुण 6 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 1 चकमक, 1 जाळपोळ, 3 खून आणि 1 ब्लास्टींग या गुन्ह्रांचा समावेश आहे. तर दुसरा नक्षलवादी दोबा कोरके वड्डे याने 2008 पासून जनमिलिशिया पदावर भरती होऊन माओवाद्याचे काम केले. त्याच्यावर आजपर्यंत एकुण 18 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 5 चकमक, 07 खून आणि इतर 6 गुन्हाच्या समावेश आहे.





