Crime News : काँग्रेस आमदाराकडून मजुराला बेदम मारहाण; रुग्णालयात उपचार सुरु
Crime News : गडचिरोलीतील आरमोरीचे काँग्रेस आमदार रामदास मसराम यांच्यासह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gadchiroli Crime News : मुरूम उत्खननाच्या वादातून एका मजुराला बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे आरमोरी मतदारसंघाचे आमदार रामदास मसराम यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई देसाईगंज पोलीस ठाण्यात करण्यात आली असून प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कुणाल विकास राजगडे असे जखमी मजुराचे नाव असून तो गंभीर जखमी अवस्थेत गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे.
नेमका वाद काय?
कोंढाळा येथे रेल्वेचे काम सुरू असून मंगळवारी मध्यरात्री मुरूम उपसा सुरू होता. त्यावेळी आमदार मसराम आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. उत्खननाची परवानगी कशी देण्यात आली, याबाबत त्यांनी उपस्थित मजुरांना विचारणा केली.
तक्रारदार कुणाल राजगडे यांनी तहसील कार्यालयाची रीतसर परवानगी असल्याचे सांगत कंत्राटदाराकडे चौकशी करण्याचा सल्ला दिला. यावरून वाद वाढला आणि संबंधितांनी काठी व हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सहा जणांविरुद्ध गुन्हा
या प्रकरणी रामदास मसराम यांच्यासह धनपाल मिसार (निवृत्त शिक्षक), अमोल मिसार, सागर वाढई, ज्ञानदेव पिलारे आणि चालक विजय भुरले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.





