Gabba Test 2024 : आकाशदीप-बुमराहने कांगारूंचे मनसुबे केले उद्धवस्त – प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी

ब्रिस्बेन – रवींद्र जडेजा बाद झाला तेव्हा फॉलोऑन ऑस्ट्रेलियाच्या नजरेसमोर होता. मात्र भारताच्या जसप्रीत बुमराह व आकाशदीप यांनी नाबाद ३९ धावांची दमदार भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाचे फॉलोऑनचे मनसुबे उद्धवस्त केल्याचे ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांनी कबूल केले. पाच सामान्यांच्या मालिकेतली तिसऱ्या कसोटीत चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिला डाव लवकर घोषित न करण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या निर्याणाचा देखील बचाव केला. बॉर्डर – गावस्कर मालिकेतील तिसरी कसोटी अनिर्णित राहण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
भारताचे लोकेश राहुलने ८४, रवींद्र जडेजाने ७७ धावांच्या खेळीनंतर बुमराहने (नाबाद १०) व आकाशदीपने (नाबाद २७) यांनी अखंड भागीदारी करताना फॉलोऑन टाळून भारताला लाजिरवाण्या परिस्थितीतून वाचविले. या संदर्भात बोलताना व्हिटोरी म्हणाला, भारताच्या पाहिल्या डावातील शेवटचा बळी आम्हाला मिळविता आला नाही. रवींद्र जडेजा बाद झाला तेव्हा आम्हाला खरोखरच चांगली संधी असल्याचे वाटले होते. मात्र आकाशदीप व बुमराहने खरोखरच संघर्षपूर्ण भागीदारी केली. त्यात दुर्दैवाने पावासाने बराच वेळ वाया गेला, असे म्हणताना व्हिटोरीने ऑस्ट्रेलियाचे मनसुबे उध्वस्त झाल्याचे मान्य केले.
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिला सामना खेळणारा आकाशदीप फलंदाजीसाठी आला तेव्हा भारताची अवस्था ९ बाद २१३ अशी होती. यावेळी भारताला फॉलोऑन टाळण्यासाठी ३३ धावांची आवश्यकता होती. मात्र भारताच्या शेवटच्या जोडीने दमदार जिगर दाखविताना दिवसअखेर पर्यंत भारताचा किल्ला अभेद्य ठेवला.
उशीर झाला असे नाही वाटत
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी ७ बाद ४०५ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र कांगारूंनी तिसऱ्या दिवशी डाव घोषित न करता खेळण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव ४४५ धावांवर संपुष्टात आला. यासंदर्भात विचारले असता व्हिटोरी म्हणाला, डाव घोषित करण्यास उशीर झाला असे मला वाटत नाही. पहिल्या डावातील धावा खूप महत्वाच्या असतात. तुम्ही हवामानानुसार योजना आखू शकत नाहीत. अनेकदा हवामान आपले अंदाज खोटे ठरवतो.
हेझलवूड पुन्हा जखमी
दुखापतीमुळे हेझलवूड ऍडलेड कसोटीमध्ये खेळाला नव्हता. त्याने ब्रिस्बेन कसोटीतून पुनरागमन केले होते. मात्र चौथ्या दिवशी पुन्हा त्याला पिंढरीला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आगामी मालिकेसाठी उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे. यासंदर्भात बोलताना व्हिटोरी म्हणाला, तो एक सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याच्या नसल्याने आमच्या रणनीतीवर परिणाम होणार आहे. मात्र, पावसाने स्टार्क व कमिन्स या आमच्या दोन्ही वेगवान गोलंदाजांना विश्रांतीची संधी दिली आहे. आज पावसामुळे खेळ वाया गेला. मात्र आज पूर्ण ९० षटकांचा खेळ झाला असता तर आम्हाला हेजलवूडच्या दुखापतीने समस्याच निर्माण झाली असती.

