G7 Summit 2024 : बायडेन, ट्रुडो यांच्याशी पंतप्रधान मोदींची स्वतंत्रपणे चर्चा…

बारी,(इटली) :- जी-७ च्या बैठकीसाठी इटलीच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. खलिस्तानी कट्टरवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या मुद्यावरून भारत आणि कॅनडा दरम्यान तणाव निर्माण झाला आहे. तर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये आणखीन एक खलिस्तानी गुरपतवंतसिंग पन्नूनच्या उघड झालेल्या हत्येच्या कटासंदर्भात चर्चा झाली. या दोन्ही आरोपांसंदर्भात भारताने यापूर्वीच उच्चस्तरिय तपास पथक नियुक्त केले आहे.
जगाच्या भल्यासाठी भारत आणि अमेरिका यापुढेही एकत्र काम करत राहतील, असे मोदी यांनी बायडेन यांच्याबरोबरच्या चर्चेनंतर सांगितले. ट्रुडो यांच्याबरोबर मोदींची चर्चा सुरू असताना दोन्ही नेते एकमेकांना शुभेच्छा देत असताना दिसत होते. मात्र त्यांच्यातील चर्चेदरम्यान कोण, काय म्हणाले, हे समजू शकले नाही.
गेल्या वर्षी सप्टंबरमध्ये जस्टिन ट्रुडो यांनी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमागे भारतीय गुप्तहेरांचा हात असल्याचा आरोप केला होता. मात्र भारत सरकारने ट्रुडो यांचा हा आरोप स्पष्ट शब्दात फेटाळून लावला होता. कॅनडामध्ये भारतविरोधी खलिस्तानी सक्रीय आहेत. अशा गटांना कॅनडाकडून सुरक्षित आश्रय आणि अभय दिले जाते आहे, हा खरा मुद्दा असल्याचे भारताने म्हटले आहे. खलिस्तानी गटांवर कॅनडाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारताच्यावतीने केली गेली आहे.
G7 Summit 2024 : जी-7 देणार भारत-मध्यपूर्व-युरोप कॉरिडॉरला प्रोत्साहन…
निज्जरला भारताने दहशतवादी घोषित केले होते. गेल्या वर्षी १८ जून रोजी ब्रिटीश कोलंबियामधील सरे भागातल्या एका गुरुद्वाराबाहेर त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.





