G. Kishan Reddy : चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यात तेलवासा परिसरात १७,००० कोटी रुपयांच्या अंदाजित गुंतवणुकीसह एक एकात्मिक ग्रीन स्टील प्रकल्प आणि कोळसा वायूकरण (गॅसिफिकेशन) प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पांमुळे १०,००० हून अधिक लोकांना रोजगार मिळेल आणि विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, अशी माहीती केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी (G. Kishan Reddy) यांनी दिली. या दोन महाप्रकल्पांच्या पायाभरणी वेळी रेड्डी बोलत होते. रेड्डी यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे अमोनिया नायट्रेट, ग्रीन स्टील आणि हायड्रोजन यांसारख्या उच्च-मूल्य असलेल्या उत्पादनांची निर्मिती होईल, ज्यांची सध्या मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते. हे भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. देशाच्या औद्योगिक विकासात कोळसा महत्त्वाची भूमिका बजावतो. देशभरात अशा एकूण सात प्रकल्पांपैकी चार प्रकल्प याच विशिष्ट प्रदेशात उभारले जात आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने अग्रेसर ठेवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, विदर्भामध्ये खनिज संपदा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. भद्रावतीमध्ये उभारल्या जाणाऱ्या या दोन प्रकल्पांचा उद्देश या संसाधनांचा वापर प्रदूषणमुक्त पद्धतीने करणे हा आहे. हवामान बदल हे एक मोठे जागतिक आव्हान आहे, ज्याचा परिणाम उद्योग आणि शेती या दोन्ही क्षेत्रांवर होत आहे. त्यामुळे खनिज संसाधनांचा वापर अशा पद्धतीने करण्यावर ठाम भर देण्यात आला आहे, ज्यामुळे शून्य प्रदूषण सुनिश्चित होईल. जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून खनिज उत्पादनाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या विकासकामांचा फायदा स्थानिक पर्यटन क्षेत्रालाही होणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.