अधिकारी महासंघाचे संस्थापक ग. दि. कुलथे यांचं निधन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व सल्लागार ग. दि. कुलथे (८७) यांचे सोमवारी रात्री साडे आठ वाजता नवी मुंबईतील नेरुळ येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी (दि. १५ एप्रिल) दुपारी १ वाजता नेरुळ सेक्टर ४ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी कामगार संघटनेसाठी अहोरात्र काम केले. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केले. हे करत असताना त्यांनी संपा सारख्या हत्याराचा वापर करणे अनेकदा टाळले. चर्चेतून प्रश्न सोडविण्यावर त्यांचा अधिक भर होता. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा संप कधीही ताणला गेला नाही. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पगार, भत्ते, निवृत्ती वेतन असते.
असे असतानाही मागील काही वर्षांमध्ये अनेक कर्मचारी भ्रष्टाचारामध्ये सापडले. ही खंत बाळगून त्यांनी राज्य महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे ‘पगारात भागवा’ या अभियानाची घोषणा केली होती. या अभियानानुसार अधिकारी महासंघातर्फे दशसूत्रीच्या अंमलबजावणीचे पत्रक राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला.
गं. दि. कुलथे हे गेल्या ५० वर्षांच्या संघटनात्मक वाटचालीत त्यांनी विक्रीकर कर्मचारी-अधिकारी संघटना, राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनांचे नेतृत्व करताना विविध पदांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे. राज्य शासनाच्या सेवेतील तब्बल ७२ खात्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार म्हणून ते तहहयात कार्यरत होते.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर पोटतिडकीने काम करणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड : फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुलथे यांच्या निधनावर दुः ख व्यक्त केले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर पोटतिडकीने काम करणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा-संवाद करण्याचा प्रसंग अनेकवेळा आला. अतिशय संयमी आणि प्रशासन म्हणून राज्य सरकारचेही कुठे हित आहे, याचा जबाबदारीने विचार करणारे असेच ते नेतृत्व होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुलथे यांना श्रद्धांजली वाहिली.
अभ्यासू, ध्येयनिष्ठ, कर्मचारीप्रिय नेतृत्व आपण गमावले : अजित पवार
राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नेते ग. दि. कुलथे यांच्या निधनाने शासन आणि अधिकारी-कर्मचारी यांच्यातील सुसंवादाचा महत्त्वाचा दुवा हरपला आहे. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रदीर्घ काळ नेतृत्व करताना त्यांनी अनेक प्रश्न कौशल्याने, यशस्वीपणे सोडविले. शांत, संयमी, परंतु महत्त्वाच्या मुद्द्यांवर कणखर भूमिका घेणारे नेते ही त्यांची ओळख सातत्याने ठळक होत गेली.
शासकीय सेवेतून निवृत्तीनंतरही दिवंगत कुलथे हे कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करीत राहिले. राज्य शासकीय राजपत्रित अधिकारी संघाचे त्यांनी प्रदीर्घकाळ नेतृत्व केले. या काळात प्रशासनात पारदर्शकता, संवेदनशीलता, जबाबदारीची भावना रुजवण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचाराला बळी पडू नये, सचोटीने वागावे, यासाठी प्रबोधनावर भर दिला. त्यांच्या नेतृत्वात सुरू झालेली ‘पगारात भागवा’सारखी चळवळ अनोखी ठरली.
ग. दि. कुलथे यांच्या निधनाने अभ्यासू, ध्येयनिष्ठ, कर्मचारीप्रिय नेतृत्व आपण गमावले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नेते ग. दि. कुलथे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.
एक संयमी, विवेकी व संघर्षशील नेत्यास सरकारी कर्मचारी वर्ग मुकला : एकनाथ शिंदे
महाराष्ट्र राज्य राजपत्रित कर्मचारी महासंघाचे व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे भक्कम आधारस्तंभ असलेले ग.दि.कुलथे यांच्या दुःखद निधनाने राज्यातील एक संयमी, विवेकी व संघर्षशील नेत्यास सरकारी कर्मचारी वर्ग मुकला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या व्यवहारात आदर्श आचारसंहिता रुजविण्याचे त्यांचे प्रयत्न एका वेगळ्या नैतिक व्यवहारांचा दीपस्तंभ ठरले होते. कर्मचारी आणि सरकार यांच्यातील संवाद व समन्वयाचा दुवा म्हणून त्यांनी दीर्घकाळ बजावलेली प्रामाणिक सेवा संस्मरणीय आहे. त्यांच्या समर्पित संघटन कौशल्यामुळे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यसंस्कृतीचे बाळकडू मिळाले होते. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख पचविण्याचे बळ त्यांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.





