गड आला पण सिंह गेला… एव्हरेस्टवीर पोलीस गरड यांच्यावर अंत्यसंस्कार

पुणे – एव्हरेस्ट चढाई यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर पोलीस कर्मचारी स्वप्निल गरड ब्रेन डेड झाले. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपयश आले. एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पुणे पोलिस दलातील या सिंहांचा अखेर मृत्यू झाला. गरड यांच्या पार्थिवावर रविवारी शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले.
स्वप्नील यांच्या पार्थिवावर मुंढवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, अश्विनी राख, सुहेल शर्मा, सहायक आयुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. या वेळी पोलिस दलाच्या जवानांनी त्यांच्या सन्मानार्थ बंदुकीतून हवेत फैरी झाडून मानवंदना दिली.
बहिणीचा हंबरडा हृदय हेलावणारा
आईसाठी, तुझ्या लाडक्या लेकीसाठी. रुग्णालयात आल्यावर तू एकदाच डोळे उघडून पाहिलंस, माझ्या सिंहा, ऊठ जायचं आता आपल्या घरी, आले बघ तुला न्यायला, असे म्हटल्यानंतर तू डोळ्यातून पाणी काढले होते. व्हिडिओ कॉलवर आई, लेक स्वर्णिका आणि पत्नीच्या हाकेला साद दिली होतीस. त्यांच्यासाठी तू जायचं नव्हतं रे.. गिर्यारोहक स्वप्नील आदिनाथ गरड यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी त्यांची शोकाकूल बहीण आरती हिचे दुःखाचे हे शब्द उपस्थितांना हेलावून सोडणारे ठरले. एव्हरेस्टवीर स्वप्नील यांच्यावर नेपाळमधील काठमांडूत उपचार करण्यात आले, पण त्यांची झुंज अपयशी ठरली. यामुळे गरड कुटुंबावर काळाने घाला घातला.
वडिलांच्या अपघाती निधनानंतर ते अनुकंपा तत्त्वावर पोलिस दलात भरती झाले होते. ते मुंढव्यातील लोणकर विद्यालयात शिकले. गरड यांनी पर्यावरणरक्षणासाठी नेहमी सायकलचा वापर केला.त्यांनी उत्तराखंडमधील नेहरू पर्वतारोहण संस्थेतून बेसिक कोर्स, तर सिक्कीममधील संस्थेतून ऍडव्हान्स कोर्स केला. त्यांनी सहा शिखरांच्या मोहिमा यशस्वी केल्या.
स्वप्नील गरड धाडसी पोलिस कर्मचारी होते. एव्हरेस्ट सर केल्यानंतर प्रकृती बिघडून त्यांचे निधन होणे हे वेदनादायक आहे. त्यांच्या निधनाने पुणे शहर आणि महाराष्ट्र पोलिस दलाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शहर पोलिस दलाकडून आवश्यक सहाय्य करण्यात येणार आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्याला अनुकंपा तत्त्वावर भरतीसाठी पूर्ण सहकार्य करण्यात येईल.
– रितेश कुमार,पोलीस आयुक्त, पुणे





