Chhagan Bhujbal : “शेतकऱ्यांच्या खात्यात दिड हजार कोटींचा निधी जमा” – छगन भुजबळ
धान उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणीची संधी मिळावी यासाठी नोंदणीची मुदत वाढविण्यात आली.

Chhagan Bhujbal – केंद्र सरकारने दिलेल्या लक्षांकानुसार राज्यात धान खरेदी सुरू असून आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर धान संकलित करण्यात आले आहे. याशिवाय शेतकरी वंचित राहू नये म्हणून लक्षांक वाढविण्याची मागणीही राज्य सरकारने केंद्राकडे केली असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधान परिषदेत सांगितले.
छगन भुजबळ म्हणाले, धान खरेदी ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना असून दरवर्षी केंद्र सरकारकडून हमीभाव जाहीर केला जातो आणि त्याच दराने राज्यात धान खरेदी केली जाते. राज्यात सहकारी पणन महासंघ व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ या दोन संस्थांमार्फत खरेदी केंद्र स्थापन करून मोठ्या प्रमाणावर धान संकलन केले जाते.
तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणीची संधी मिळावी यासाठी नोंदणीची मुदत वाढविण्यात आली. या कालावधीत राज्यातील 7 लाख 16 हजार 331 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. धानाला सध्या 2369 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्यात येत असून महाराष्ट्र सरकारकडून अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता दिला जातो.
दोन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 20 हजार प्रोत्साहन भत्ता दिला जात आहे. या अंतर्गत 1635.78 कोटींपैकी 1588.76 कोटी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून उर्वरित रक्कम संबंधित संस्थांमार्फत वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे.
तसेच धान साठवणुकीसाठी गोदामांची कमतरता भासू नये यासाठी 331.49 कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.






