Devendra Fadnavis : “केवळ निधी हे एकमेव कारण नव्हते तर….”; फडणवीसांनी पडद्यामागे नेमकं काय घडलं ते सांगितलं म्हणाले “दिल्लीचा आदेश..”
Devendra Fadnavis : अखेर या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं आहे.

Devendra Fadnavis : गेल्या काही दिवंसापूर्वी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी अॅापरेशन टायगर २.० फत्ते केलं. हे अॅापरेशन करताना त्यांना मुख्यमंत्र्यांची मदत मिळाल्याची दबक्या आवाजात चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं आहे. “हे ऑपरेशन आमच्या मित्रपक्षाने (शिवसेनेने) केले असून, मित्रपक्ष म्हणून आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आणि आवश्यक ती मदत होती.” मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
जे सहा खासदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले त्यांनी निधी मिळत नसल्याचे कारण दिले होते. पण फडणवीसांनी केवळ निधी एवढेच कारण नव्हते तर दुसरेही कारण काय होते या विषयी भाष्य केलं. ते म्हणाले “निधी हे एकमेव कारण असू शकत नाही. राजकारणात प्रत्येक जण आपले भविष्य पाहत असतो. जेव्हा मूळ नेतृत्व आत्मविश्वास देणे बंद करते, तेव्हा लोक जिथे भविष्य सुरक्षित आहे तिथे जातात.”
पुढं बोलताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांना खोचक टोला लगावला. “नेत्याने नेहमी ‘लीड फ्रॉम फ्रंट’ केले पाहिजे. आम्ही स्वतः अडीच वर्षे विरोधी पक्षात असताना आम्हाला एक रुपयाचा निधी मिळाला नाही, तरी आमचा एकही आमदार फुटला नाही.”
फडणवीसांनी केला मोठा खुलासा
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सहा खासदारांनी बंड केलं. त्यावेळी हे सहा खासदार भाजपमध्ये जाणार अशीही चर्चा सुरू होती. मीडियामध्ये याविषयी माहिती दिली जात होती. पण मुख्यमंत्र्यांनी खासदारांना शिंदेंच्या शिवसेनेत जायला हवं असं सांगितले होतं. यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “आम्ही साधारणपणे आमचं दार बंद ठेवलं.
स्पष्ट सांगायचं झालं तर आमचं दार बंद होतं. आम्ही या कोणाही करता भाजपचं दार उघडलं नव्हतं. कारण आमचं असं मत होतं की, त्यांना जर जायचं असेल तर त्यांनी शिवसेनेत जावं. शिवसेना हा त्यांचाच पक्ष आहे, ते शिवसेनेत निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांनी शिवसेनेतच जावं. पुढं त्यांनी बोलताना “हे खरं आहे की, त्यातल्या एक-दोन लोकांनी इच्छा पण प्रदर्शित केली की, आम्हाला भाजपमध्ये यायचंय. पण आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की, आमच्याकडे व्यवस्था सध्या नाही.” असा मोठा खुलासा देखील फडणवीसांनी केला.
छोटे-मोठे विषय राज्यामध्येच सोडवण्याचे निर्देश : फडणवीस
नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळाले. अनेकांना डावल्याने त्यांनी पक्षनेतृत्वावर स्पष्टपणे नाराजी उघड केली होती. जागा वाटपात जोरदार रस्सीखेच झाल्याची देखील चर्चा होती. यावर देखील फडणवीसांनी भाष्य केलं. “तीन वेगवेगळे पक्ष एकत्र असल्याने स्थानिक पातळीवर काही स्पर्धात्मक हितसंबंध असू शकतात, पण ती तात्पुरती भांडणे आहेत. तसेच, दिल्ली हायकमंडने महाराष्ट्रातील छोटे-मोठे विषय राज्यामध्येच सोडवण्याचे निर्देश दिले असून दिल्लीला इतर अनेक कामे आहेत.”असे फडणवीस म्हणाले. हे सारं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका डिजिटल वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
हेही वाचा : Neha Dhupia : “हे सगळं बंद करा,” नेहा धुपिया पापाराझींवर भडकली






