कोरेगाव – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून 12 कोटी 77 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशाप्रमाणे ग्रामविकास विभागाने आदेश काढले असून, आमदार महेश शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. कोरेगाव मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव, खटाव व सातारा तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी आमदार महेश शिंदे यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या प्रस्तावाला तात्काळ मान्यता दिली. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनीही तातडीने निधी मंजूर केला असून, यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सहकार्य लाभले. जरंडेश्वर डोंगरावर वर्षातील प्रत्येक शनिवारी भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन, सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर भिवडीतून जांब बुद्रुकमार्गे डोंगराच्या पायथ्यापर्यंतच्या सव्वाचार किमीच्या रस्त्यासाठी तीन कोटी 94 लाख 65 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा रस्ता झाल्यानंतर भिवडी-जांब बुद्रुक-जळगाव असा प्रवास करणाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची सोय होणार आहे. महात्मा जोतिबा फुले यांची जन्मभूमी कटगुण (ता. खटाव) गावापासून धारपुडीपर्यंत रस्त्याच्या दर्जोन्नतीसाठी पाच कोटी सात लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कटगुण, खातगुण, धारपुडीसह पंचक्रोशीतील गावांना या रस्त्याचा फायदा होणार आहे. सातारा तालुक्यातील ऊस उत्पादकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या इतर जिल्हा मार्ग क्र. 48 ते खंडोआप्पाचा मळा-यादव मळा-मालगाव रस्त्याच्या दर्जोन्नतीसाठी एक कोटी 85 लाख 88 हजार रुपये आणि गोवे ते खंडोबाचीवाडी रस्त्यासाठी एक कोटी 91 लाख 46 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची समस्या कायमस्वरूपी सुटणार आमदार महेश शिंदे हे मतदारसंघात विकासकामांचा शुभारंभ, सत्कार समारंभ, विवाह सोहळ्यांसाठी दौरे करत असतात. या दौऱ्यांमध्ये ते गावांचे बारकाईने निरीक्षण करून, जनतेच्या अपेक्षा जाणून घेतात. भिवडी-जांब बुद्रुकमार्गे-जळगाव या रस्त्यावर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे जळगाव येथे गोदाम आहे. तेथे वर्षभर अवजड वाहतूक होते. त्यामुळे या रस्त्याची सातत्याने दुरवस्था होते. हे लक्षात घेऊन आमदार शिंदे यांनी या रस्त्याच्या दर्जोन्नतीचा प्रस्ताव सादर केला होता. हा रस्ता नव्याने करण्यासाठी. त्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन संशोधन व विकास यामध्ये या रस्त्याचा समावेश केला आहे. त्यामुळे या गावांमधील शेतकऱ्यांची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे.