US-Israel strikes on Iran: मध्यपूर्वेतील युद्धाचा भारतीय विमान वाहतुकीला मोठा फटका; 179 उड्डाणे रद्द
US-Israel strikes on Iran: दक्षिण इराणमध्ये अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात एका शाळेवर बॉम्ब पडून ५१ विद्यार्थी ठार झाल्याचे इराणच्या सरकारी दूरदर्शनने सांगितले. या साखळी घटनांमुळे मध्यपूर्वेतील संपूर्ण हवाई वाहतूक विस्कळीत झाली असून लाखो प्रवासी अडचणीत सापडले आहेत.

US-Israel strikes on Iran: अमेरिका-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यांनंतर मध्यपूर्वेतील हवाई क्षेत्र बंद झाल्याने भारतीय विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. एअर इंडिया, इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, स्पाइसजेट आणि अकासा एअर यांच्या मिळून एकूण १७९ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
कोणत्या विमान कंपनीची किती उड्डाणे रद्द?
इंडिगोची ७२, एअर इंडिया एक्सप्रेसची ५५, एअर इंडियाची ३१, स्पाइसजेटची १३ आणि अकासा एअरची ८ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
कोणते मार्ग बंद?
एअर इंडियाने अबुधाबी, दुबई, दोहा, रियाध, जेद्दा, दम्माम, मस्कत आणि तेल अवीव या सर्व मार्गांवरील उड्डाणे रद्द केली आहेत. इंडिगोने १ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मध्यपूर्वेतील सर्व उड्डाणे स्थगित केली असून “हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेण्यात आला आहे,” असे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा – ‘खूप चिंतेचा विषय’! इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्यांवर भारताची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, इराणने अमेरिकी लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागल्यानंतर UAE, बहरीन, सौदी अरेबिया आणि कुवेतमध्ये स्फोट झाले. अबुधाबीवरील इराणी हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचे UAE च्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. दक्षिण इराणमध्ये अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात एका शाळेवर बॉम्ब पडून ५१ विद्यार्थी ठार झाल्याचे इराणच्या सरकारी दूरदर्शनने सांगितले. या साखळी घटनांमुळे मध्यपूर्वेतील संपूर्ण हवाई वाहतूक विस्कळीत झाली असून लाखो प्रवासी अडचणीत सापडले आहेत.





