पुणे – खास मैत्रीणीच्या भावाला मारहाण होताना वाचवणे एका तरुणाला भलतेच महागात पडले आहे. संबंधीत आरोपींनी याचा बदला घेत त्याला मारहाण करत त्याच्या भावाच्या गालावर आणि डोक्यावर कोयत्याने वार करुन खूनाचा प्रयत्न केला. तर त्याच्या वडिल व शेजारच्यांवरही कोयत्याने वार केले. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहन बबन उत्तेकर(22,रा.साईनगर, हिगंणे) याने दिलेल्या फिर्यादीनूसार निरज ढवळे, दिनेश ढवळे, संजय ढवळे, अविनाश ढेंबे(सर्व रा.साईनगर) यांना अटक करण्यात आली आहे. यातील सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.
फिर्यादीचे एका मुलीबरोबर प्रेमसंबंध आहेत. तीच्या भावाला यातील आरोपी त्रास देऊन मारहाण करत होते. यावेळी फिर्यादी व फिर्यादीच्या भावाने ही भांडणे सोडवली होती.त्यावेळी आरोपी निरज व फिर्यादीमध्ये बाचाबाची झाली होती. ही भांडणे फिर्यादीचा मोठा भाऊ योगेशच्या मध्यस्थीने सोडविण्यात आली. याचा राग आरोपींच्या मनात होता. यामुळे गुरुवारी रात्री आरोपी फिर्यादीच्या घरासमोर आले. त्यांनी त्याला बाहेर बोलावून तुम्हाला लय मस्ती आली आहे का अशी विचारणा केली. यानंतर फिर्यादीच्या भाऊ योगेश याच्या गालावर व डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर फिर्यादीस दगडाने मारुन तसेच फिर्यादीचे वडिल व शेजारच्या नंदन नरे यांच्या हातावर कोयत्याने वार केले. यानंतर हवेत कोयता फिरवून दहशत पसरवली . याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक कणसे करत आहेत.