सर्वसाधारणपणे कोणतीही निवडणूक जाहीर झाली की, विविध राजकीय पक्ष अनेक प्रकारे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचाराची व्यासपीठे गाजवत असतात. पण महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अजून जाहीर झाली नसली तरी दसर्याचे निमित्त साधून बहुतेक सर्व राजकीय पक्षांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी नारायण गडावर मेळावा घेऊन मराठा समाजाची शक्ती दाखवून दिली, तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बंधू-भगिनींनी भगवान गडावर दरवर्षीप्रमाणे मेळावा घेऊन ओबीसी समाजाचे शक्ती प्रदर्शन केले.
राज्यात सकाळी या घडामोडी घडत असताना संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा आझाद मैदानावर मेळावा झाला, तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांनी शिवाजी पार्कवर दरवर्षीप्रमाणे मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन केले. दुसरीकडे, दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन नागपूर येथे पार पाडून त्या ठिकाणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांसमोर भाषण करताना त्यांना काही सूचक असे निर्देश दिले.
व्यासपीठ गाजवण्यात वाक्बगार असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी दसर्याचे निमित्त साधून व्यासपीठावर जाऊन भाषण न करता सोशल मीडियाचा वापर करून मतदारांना क्रांती घडवण्याचे आवाहन केले. विजयादशमी किंवा दसरा हा सण सीमोल्लंघनाचा असतो आणि या निमित्ताने काही महत्त्वाचे संकल्प केले जातात. त्याचाच आधार घेऊन या सर्व नेत्यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या मनातील विचार व्यक्त करून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्याची संधी साधली. जेव्हा एकाच दिवशी अशा प्रकारे ‘दसर्याचे मैदान’ गाजवण्याचे नियोजन केले जाते तेव्हा निश्चितच त्यांची तुलना अपरिहार्य असते.
कोणत्या पक्षाच्या किंवा संघटनेच्या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात गर्दी जमली किंवा कोणत्या मेळाव्याला खुर्च्या रिकाम्या होत्या याबाबत माध्यमांनासुद्धा उत्सुकता असते. पण यावेळी जे काही मेळावे झाले त्या सर्वच मेळाव्यांना तुफान गर्दी झाली असल्यामुळे माध्यमांनासुद्धा निश्चित अंदाज घेतला आला नाही. अर्थात, या सर्व मेळाव्यांमध्ये कोणत्या प्रकारची भाषणे होणार आणि कोणत्या प्रकारची टीका होणार हे गृहीतच होते. मनोज जरांगे यांनी नारायणगड येथील मेळाव्यात बोलताना सरकारने विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर करावा एवढीच अपेक्षा व्यक्त केली आणि असा निर्णय झाला नाही, तर आमचा निर्णय आम्ही नंतर जाहीर करू असे संकेतही दिले. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळावामध्ये पारंपरिक पद्धतीनेच भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांनाच लक्ष केले.
खोके सरकार, मिंधे सरकार, घटनाबाह्य सरकार, अब्दाली, खान, दिल्लीश्वर ह्या नेहमीच्या शब्दांचा वापर करून उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्या पद्धतीने टोमणे मारून सरकारवर टीका केली. या मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे यांचे भाषण हीच एक वैशिष्ट्यपूर्ण बाब राहिली. एकनाथ शिंदे यांनीसुद्धा आपल्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये भाषण करताना नेहमीच्या शैलीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावरच टीका केली. ‘मी घरी बसून फेसबुक लाइव्ह पद्धतीने काम करणारा मुख्यमंत्री नसून लोकांमध्ये मिसळणारा आणि निर्णय घेणारा मुख्यमंत्री आहे’ हाच नेहमीचा मंत्र त्यांनी जपला.
येत्या दिवसांच्या कालावधीमध्ये निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागू झाल्यानंतर खर्या अर्थाने निवडणुकीची मैदाने गाजवण्यास जरी प्रारंभ होणार असला, तरी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने काही ठोस आणि भरीव मुद्दे न मांडता एकमेकांवर पूर्वीच्याच पद्धतीने टीका करण्याचे काम झाले. याला काही प्रमाणात अपवाद ठरला मुंडे बंधू-भगिनी यांचा मेळावा. गेल्या बारा वर्षांच्या कालावधीपासून पंकजा मुंडे भगवानगडावर मेळावे घेत आहेत.
पण धनंजय मुंडे कधी या मेळाव्याला हजर राहत नव्हते. यावेळी मात्र त्यांनी विशेष उपस्थिती दाखवून आपल्यातील एकीही सिद्ध केली. राज्यात कुठेही दलित आणि ओबीसी बांधवांवर अन्याय झाला तर आम्ही मोठ्या प्रमाणावर त्याला प्रतिकार करू अशा प्रकारचा सूचक इशारा अप्रत्यक्षपणे भगवानगडावरील मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला हेसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे आहे.
पण मनोज जरांगे पाटील यांनी मात्र आपली नेहमीची आक्रमक शैली बाजूला ठेवून सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणाचा निर्णय घ्यावा ही अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या या मेळाव्याला जमलेल्या प्रचंड गर्दीने सरकारला योग्य संकेत देण्याचे काम निश्चितपणे केले आहे. नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यामध्येही सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदूंनी एकत्र येण्याच्या गरजेवर भर दिला. गेल्या काही दिवसांत सातत्याने भागवत आणि संघाचे इतर पदाधिकारी हिंदू एकत्रिकरण या मुद्द्यावर भर देत आहेत आणि तीच भूमिका दसरा मेळाव्यात भागवत यांनी कायम ठेवली.
राज ठाकरे यांचा मेळावा येत्या 2 दिवसांत होणार असला, तरी या मेळाव्यात ते काय बोलणार याची चुणूक त्यांनी सोशल मीडियावर भाषण करून दाखवून दिली. आतापर्यंत सर्वांना संधी दिलीत आता मला संधी द्या, हाच राज ठाकरे यांच्या संवादाचा गाभा होता. एकूणच दसरा मेळाव्याचे निमित्त साधून सर्वांनी मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. आगामी काळात जेव्हा निवडणूक जाहीर होईल तेव्हा विविध राजकीय पक्षांची प्रचाराची दिशा काय असेल हे दाखवून देण्याचे काम निश्चितपणे या मेळाव्यांनी केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विरोधी पक्षांचे प्रचाराचे मुद्दे काय असतील आणि सरकारी पक्षांचा कोणत्या मुद्द्यावर भर असेल याचाही अंदाज आता एकमेकांना आला आहे. पण मतदारांना काय वाटते याचा अंदाज मात्र कोणालाही आला नाही, हे निश्चित.