अग्रलेख : मान्सूनचा तडाखा

यंदा मान्सून अपेक्षेपेक्षा खूपच लवकर दाखल झाला. केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर केवळ 24 तासांत तो महाराष्ट्रात दाखल झाला. महाराष्ट्रात सगळीकडे मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण सुरू असताना आणि त्या पावसाने बर्याच भागाला तडाखा दिलेला असताना अचानक आलेल्या मान्सूनने सगळीकडेच दैना उडाली. ठिकठिकाणी या पावसाने दिलेला फटका मोठा आहे. पूर्वी कायम पावसाची प्रतीक्षा करायला लागणार्या भागातसुद्धा या पावसाने रौद्ररूप धारण केले आणि भिगवण, बारामती, सोलापूर, बार्शी अशा पर्जन्याचा अभाव असलेल्या भागात चक्क रस्त्यावर नद्या वाहू लागल्याचे दृश्य आपल्याला पाहायला मिळाले.
या पहिल्याच पावसात उजनी धरणाचा उपयुक्त साठा प्लसमध्ये गेल्याचीही बातमी प्रसिद्ध झाली आहे. मान्सूनचे आगमन एरवी सुखद मानले जाते, पण यावेळी मात्र या पावसाने जबरी तडाखा दिलेला दिसला. या मान्सूनमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला तर प्राथमिक माहितीनुसार राज्यातील तब्बल 32 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली असून राज्यातल्या 425 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. राज्याच्या अनेक भागात याआधीच मान्सूनपूर्व पाऊस थैमान घालत होता. त्यात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले.
तेथील सुमारे 13 हजार हेक्टरवरील मूग, कांदा, ज्वारी, केळी, संत्री अशा पिकांचे नुकसान झाले. त्या खालोखाल जळगाव आणि नाशिकलाही मान्सूनपूर्व पावसाने तडाखा दिला होता. तेथील सुमारे 3200 हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या मान्सूनपूर्व पावसाचे थैमान सुरू असतानाच साक्षात मान्सूनही ठिकठिकाणी इतका बरसला की त्यामुळे अनेक ठिकाणी पूरजन्यस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. रेड अलर्टमुळे राज्याच्या विविध भागात एनडीआरएफची पथके तैनात करण्याची वेळ आली. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा महानगरांमध्ये नालेसफाईचे पितळ उघडे पडले आहे.
काल महानगरी मुंबईला अभूतपूर्व पावसाने झोडपले. त्यामुळे तेथेही पहिल्याच पावसात मोठी वाताहत झाल्याचे पाहायला मिळाले. याचा मुंबई मेट्रोला मोठा तडाखा बसला. मेट्रोच्या तीन मार्गाला बसलेल्या तडाख्यामुळे तेथील काही स्थानकांमध्ये पाणी शिरले आणि मेट्रो वाहतुकीची वाट लागली. काल मुंबई तुंबली आणि आज लगेच त्यावरून राजकारण सुरू झाले. पावसाळी कामांसाठी खर्ची घातलेले हजारो कोटी रुपये कोठे गेले, पहिल्याच पावसात मुंबईची इतकी दैना कशी उडाली, असे प्रश्न ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने उपस्थित केले. त्यावर लगोलग भाजपकडून पूर्वीचेच छापील साच्यातील उत्तर दिले गेले.
मुंबई महापालिकेवर ज्यांची पंचवीस वर्षे सत्ता होती त्यांच्या गैरकारभारामुळेच मुंबई तुंबल्याचा आरोप भाजपकडून केला गेला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. संजय राऊत यांनी भाजपवर 35 हजार कोटी रुपयांचा मलिदा खाल्ल्याचा आरोप केला, तर भाजपच्या आशिष शेलार यांनी ठाकरे सेनेवर एक लाख कोटी रुपयांच्या गफलतीचा आरोप केला आहे. लोकांना आता असल्या आरोप-प्रत्यारोपांची नुसती सवयच झालेली नाही, तर त्याचा उबगही यायला लागला आहे. पण त्यातून मुंबईची परिस्थिती काही सुधारताना दिसत नाही.
पहिल्याच पावसात मुंबईला एवढा मोठा तडाखा बसला असेल, तर मग पावसाळ्याची दक्षता म्हणून जे पैसे खर्च केले त्याचा नेमका परिणाम काय झाला, याचे उत्तर देण्याची जबाबदारी आता भारतीय जनता पक्षाची आहे. पुण्यातही मान्सूनने मोठा तडाखा दिला असून या शहरातही नालेसफाईच्या कामाचा बोजवारा उडत असल्याचे दिसू लागले आहे. शहराच्या अनेक भागात रस्त्यावर साठलेल्या प्रचंड पाण्यामुळे वाहतूक तर कोलमडलीच, पण पुन्हा शहरात खड्ड्यांचे साम्राज्य उद्भवण्याची चिन्हेही दिसू लागली आहेत. पावसाच्या राज्यभरातील या ठिकठिकाणीच्या बातम्या वाचल्यानंतर आणि त्यातून झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतल्यानंतर राज्य सरकारला या पावसाळ्यात आता अधिक जागरूकपणे आपली यंत्रणा सतर्क करावी लागणार आहे.
नुसतं अधिकार्यांना सतर्क राहण्याची सूचना देऊन मंत्र्यांना नामानिराळे राहता येणार नाही, तर प्रत्यक्ष मैदानावर उतरून त्यांना या परिस्थितीवर देखरेख ठेवावी लागेल. पुणे जिल्ह्यात पावसाने जी दाणादाण उडाली त्याबाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पाहणी करताना आढळले. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसानभरपाई देण्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली आहे हे चांगले झाले, पण राज्याच्या अन्य भागातही राज्य सरकारने अशीच तत्परता दाखवणे अपेक्षित आहे. राजकीय हिशेब तुम्ही निवांतपणे चुकता करा पण आपत्तीच्या काळात मात्र आपले सगळे लक्ष लोकांची गैरसोय दूर करण्याकडे ठेवा असे त्यांना निक्षून सांगण्याची वेळ आली आहे.
राज्य सरकारच्या तिजोरीत सध्या खडखडाट असल्याच्या बातम्या यापूर्वी अनेक वेळा येऊन गेल्या असल्या तरी आता पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदतीचा हात देणे, ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे अशा नागरिकांना मदत करणे यासाठी सरकारला पुरेशी आर्थिक तजवीज करावी लागेल. केवळ तोंडी वाफ दवडून त्यांना जनतेला वार्यावर सोडता येणार नाही. महानगरांमध्ये पावसामुळे होणारी दैना दुरुस्त करण्याचे काम केवळ त्या त्या महापालिकांच्या अधिकार्यांवर सोपवून चालणार नाही. तेथेही तातडीच्या आर्थिक मदतीची तत्परता राज्य सरकारला दाखवावी लागणार आहे. मान्सूनचे आगमनच इतके नुकसानकारक झाले असेल, तर अजून जून महिनासुद्धा उजडायचा आहे, अजून यापुढचे चार महिने अशा आपत्ती वारंवार उद्भवणार आहेत याचे भानही सरकारला ठेवावे लागेल.





