१. महापालिका निवडणुकांची घोषणा आज होण्याची शक्यता राज्य निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील प्रलंबित असलेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जर आज आयोगाने घोषणा केली तर आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. २. एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? – तुकाराम मुंढे भाजप आमदार कृष्ण खोपडे यांनी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांचे समर्थक फोन करून धमकी देत असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र सरकारकडून मुंडेंना यांना त्यांच्यावर करत असलेल्या आरोपांवर क्लिन चिट दिल्याचे जाहीर केले. अखेर या संपूर्ण प्रकरणावर मुंडे यांनी एका वृत्तवहिनीशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही म्हणून माझ्याविरोधात कटकारस्थान करत आहेत. एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? असा सवाल करत मुंडे यांनी नाव न घेता खोपडे यांच्यावर निशाणा साधला. ३. राज ठाकरेंना बरोबर घेणं ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक – रामदास आठवले मुंबई महापालिकेची निवडणूक मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र लढण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘राज ठाकरेंना बरोबर घेणं ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक आहे’, असं रामदास आठवले म्हणालेत. ‘ लोकसभेला राज ठाकरे महायुती बरोबर असताना आम्हाला फार काही फायदा झालेला नाही. मात्र, विधानसभेला ते आमच्या बरोबर नव्हते तर आम्हाला जास्त फायदा झाला,” असेही यावेळी आठवले म्हणाले. ४. राज्यभरात थंडीचा कडाका वाढला राज्यासह देशात कडाक्याची थंडी वाढली आहे. पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर आणि सातारा या भागांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत असून येथे 10 अंश सेल्सिअस तापमान होते. तर धुळ्यात 6 अंश सेल्सिअस तापमान होते. धुळ्यात मागील काही दिवसांपासून कडाक्याची थंडी आहे. 31 डिसेंबरपर्यंत हवामान थंड राहील, तापमानाचा पारा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईची हवा पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनली आहे. वाढत्या प्रदूषणाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. खोकला, सर्दी, दम्याचे तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. ५. कराड गँगची जिल्हा कारागृहातही दादागिरी चालू मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांच्या टोळक्याचा माज जिल्हा कारागृहातही कायम असल्याचे समोर येत आहे. कारागृहातील एका कर्मचाऱ्याला या आरोपींकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बाबा कवठे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, कराड गँगची कारागृहात दादागिरी सुरू असल्याचा आरोप होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट करून हे प्रकरण उघडकीस आणले असून, ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ६. नितीन नबीन यांची भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली. या नियुक्तीबाबत भाजपने अधिकृत आदेश जारी केला असून ही नियुक्ती १४ डिसेंबर २०२५ पासून तत्काळ लागू झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ही नियुक्ती भाजपच्या संसदीय बोर्डाने केली आहे. नितीन नबीन आता राष्ट्रीय स्तरावर संघटनेची महत्त्वाची जबाबदारी सांभाळतील, असे आदेशात म्हटले आहे. याआधी जेपी नड्डा यांनाही राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यापूर्वी कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती; त्यामुळे नबीन यांच्या नियुक्तीकडे मोठ्या भूमिकेचा संकेत म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, नितीन नबीन सध्या बिहारमधील नितीर कुमार सरकारमध्ये रस्ते बांधकाम मंत्री आहेत. ते पाटण्याच्या बांकीपूर मतदारसंघातून चार वेळा आमदार झाले आहेत. ७. ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, पाकिस्तान कनेक्शन समोर ऑस्ट्रेलियातील बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला. तर 42 जण जखमी झाले. बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर ज्यू नागरिक सण साजरा करत असताना दोन हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. दोन्ही हल्लेखोर वडील आणि मुलगा असून यात 50 वर्षीय हल्लेखोराला पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले. 24 वर्षीय व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. विशेष म्हणजे, हल्ल्यात सहभागी असलेले वडील आणि मुलगा पाकिस्तानी वंशाचे असल्याचे ओळखले गेले आहे. भारताने या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वाईट काळात आम्ही ऑस्टेलियाच्या सरकारसोबत खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले आहे. ८. अमेरिकेकडून व्हिसाचे नियम कडक; आजपासून भारतीयांविरोधात कारवाई अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हिसाचे नियम सातत्याने कडक करत आहेत. अमेरिकी स्टेट डिपार्टमेंटने H-1B आणि H-4 व्हिजा अर्जदारांचे सोशल मीडिया प्रोफाइल तपासणे सरकारने अनिवार्य केले आहे. हा नवीन नियम 15 डिसेंबर 2025 म्हणजेच आजपासून लागू करण्यात आला आहे. अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या लोकांना त्यांचे सोशल मीडिया अकाऊंड आता पब्लिक करावे लागेल. याद्वारे अमेरिकन अधिकाऱ्यांना सोशल मीडियावर अकाऊंट तपासून त्यांना व्हिसा नाकारूही शकतात. ९. मॅच फिक्सिंगमध्ये सहभाग असल्याच्या आरोप; ४ क्रिकेटपटू निलंबित आसाम क्रिकेट असोसिएशनने (एसीए) अमन त्रिपाठी, अमित सिन्हा, इशान अहमद आणि अभिषेक ठाकुरी यांना सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 दरम्यान मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याबद्दल निलंबित केले. त्यांच्यावर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये सहभागी झालेल्या काही आसाम खेळाडूंना प्रभावित करण्याचा आणि भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यानुसार आता हे चारही खेळाडू जिल्हा युनिट्स किंवा संलग्न क्लबद्वारे आयोजित कोणत्याही राज्यस्तरीय स्पर्धा किंवा सामन्यांमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत. १०. “…तर माफ करा,” धर्मेंद्र यांचा शेवटचा व्हिडीओ व्हायरल दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाला २० दिवस झाले असून त्यांचे कुटुंबीय व चाहते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरण्याचा ते प्रयत्न करत आहेत. धर्मेंद्र ‘इक्कीस’ चित्रपटात झळकणार आहेत. आता ‘इक्कीस’ सिनेमाच्या टीमने धर्मेंद्र यांचा सेटवरील शेवटचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत काही चूक झाली असेल तर मला माफ करा, असं धर्मेंद्र म्हणत आहेत. धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ ‘इक्कीस’ च्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा आहे. त्या दिवशी सेटवर धर्मेंद्र भावुक झाले होते आणि त्यांनी चित्रपटाच्या टीम आणि चाहत्यांसाठी त्यांचा मेसेज रेकॉर्ड केला होता.