Web Series: पुस्तकांतून थेट OTTवर! ‘मुसाफिर कॅफे’ ते ‘पाताल लोक’… या ७ वेब सीरिज एकदा तरी पाहाच
Web Series पुस्तकांवर आधारित वेब सीरिजचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामधील कथा अधिक सखोल आणि प्रभावी असतात. लेखकांनी उभे केलेले पात्र, त्यांचे संघर्ष आणि भावविश्व पडद्यावर पाहण्याचा अनुभव वेगळाच असतो.

Web Series: ओटीटीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे वेब सीरिजचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या काही वर्षांत अनेक गाजलेल्या कादंबऱ्या आणि पुस्तकांवर आधारित वेब सीरिज प्रदर्शित झाल्या असून, त्यांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. दमदार कथा, प्रभावी अभिनय आणि उत्कृष्ट सादरीकरणामुळे या सीरिज आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. नुकतीच प्रदर्शित झालेली ‘मुसाफिर कॅफे’ ही वेब सीरिजही अशाच पुस्तकावर आधारित असून, तिची सध्या सर्वत्र चर्चा आहे. जर तुम्हाला पुस्तकांवर आधारित वेब सीरिज पाहायला आवडत असतील, तर या सात सीरिज नक्की पाहा. (Web Series)
१. मुसाफिर कॅफे (Web Series)
दिव्य प्रकाश दुबे यांच्या लोकप्रिय कादंबरीवर आधारित ‘मुसाफिर कॅफे’ ही रोमँटिक वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. विक्रांत मॅसी, महिमा मकवाना आणि वेदिका पिंटो यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजमधील प्रेमकथा आणि भावनिक मांडणी प्रेक्षकांना आवडत आहे. पुस्तकातील भावना पडद्यावरही तितक्याच प्रभावीपणे साकारण्यात आल्या आहेत.

मुसाफिर कैफे
२. फ्रीडम अॅट मिडनाईट (Web Series)
भारताच्या स्वातंत्र्याचा आणि फाळणीच्या काळाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर ‘फ्रीडम अॅट मिडनाईट’ ही वेब सीरिज उत्तम पर्याय आहे. डॉमिनिक लापिएर आणि लॅरी कॉलिन्स यांच्या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित ही सीरिज भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचे प्रभावी चित्रण करते. IMDb वर या सीरिजला ८.४ रेटिंग मिळाले आहे.
३. द फ्रीलान्सर (Web Series)
नीरज पांडे दिग्दर्शित ‘द फ्रीलान्सर’ ही थरारक वेब सीरिज शिरीष थोरात यांच्या ‘अ टिकीट टू सीरिया’ या पुस्तकावर आधारित आहे. आयसिसच्या ताब्यात अडकलेल्या एका भारतीय महिलेची सुटका करण्यासाठी सुरू झालेल्या मोहिमेची ही कथा आहे. मोहित रैना यांच्या दमदार अभिनयामुळे या सीरिजला विशेष पसंती मिळाली असून IMDb वर तिला ८.१ रेटिंग मिळाले आहे.

The Freelancer
४. ब्लॅक वॉरंट
तिहार तुरुंगातील वास्तव आणि एका जेल अधिकाऱ्याच्या अनुभवांवर आधारित ‘ब्लॅक वॉरंट’ ही वेब सीरिज २०२५ मध्ये प्रदर्शित झाली. सुनील गुप्ता आणि सुनेत्रा चौधरी यांच्या ‘ब्लॅक वॉरंट: कन्फेशन्स ऑफ अ तिहार जेलर’ या पुस्तकावर ही सीरिज आधारित आहे. कारागृहातील वास्तववादी चित्रणामुळे या सीरिजची विशेष चर्चा झाली.
५. खाकी : द बिहार चॅप्टर
आयपीएस अधिकारी अमित लोढा यांच्या ‘बिहार डायरीज’ या पुस्तकावर आधारित ‘खाकी : द बिहार चॅप्टर’ ही वेब सीरिज गुन्हेगारी, राजकारण आणि पोलिस यंत्रणेवर आधारित आहे. करण टॅकर आणि अविनाश तिवारी यांच्या भूमिका या सीरिजचे प्रमुख आकर्षण आहेत. IMDb वर या सीरिजला ८.१ रेटिंग मिळाले असून ती आजही लोकप्रिय आहे.
६. पाताल लोक
जयदीप अहलावत यांच्या दमदार अभिनयामुळे ‘पाताल लोक’ ही वेब सीरिज प्रचंड गाजली. गुन्हेगारी, राजकारण आणि समाजातील वास्तव यांचे प्रभावी चित्रण या सीरिजमध्ये पाहायला मिळते. लेखक तरुण तेजपाल यांच्या ‘द स्टोरी ऑफ माय असॅसिन’ या पुस्तकातून या सीरिजला प्रेरणा मिळाल्याचे मानले जाते. IMDb वर या सीरिजला ८.२ रेटिंग मिळाले आहे.
७. सेक्रेड गेम्स
भारतीय ओटीटी विश्वात मोठी क्रांती घडवणाऱ्या ‘सेक्रेड गेम्स’चा उल्लेखही या यादीत आवर्जून करावा लागेल. विक्रम चंद्र यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित ही वेब सीरिज सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या अभिनयामुळे प्रचंड लोकप्रिय झाली. गुन्हेगारी, राजकारण आणि रहस्य यांचा उत्कृष्ट संगम या सीरिजमध्ये पाहायला मिळतो.

सेक्रेड गेम्स
पुस्तकांवर आधारित वेब सीरिजचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामधील कथा अधिक सखोल आणि प्रभावी असतात. लेखकांनी उभे केलेले पात्र, त्यांचे संघर्ष आणि भावविश्व पडद्यावर पाहण्याचा अनुभव वेगळाच असतो. त्यामुळे तुम्ही अद्याप या वेब सीरिज पाहिल्या नसतील, तर तुमच्या वॉचलिस्टमध्ये त्यांचा नक्की समावेश करा.





