बारामती, महाबळेश्वरसह 23 नगरपरिषद-नगरपंचायतींसाठी आज मतदान राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज (20 डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २८८ नगरपरिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम ४ नोव्हेंबरला जाहीर केला होता. त्यानुसार २ डिसेंबरला २६३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. उर्वरित ठिकाणी आज मतदान होणार आहे. त्यानंतर उद्या (21 डिसेंबर) राज्यभरातील एकूण 288 नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निकाल लागणार आहे. उद्योगपतीकडून मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘पंतप्रधान’ असा उल्लेख उद्योजक सज्जन जिंदाल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचा पंतप्रधान असा उल्लेख केला, मात्र आपली चूक लक्षात येताच सज्जन जिंदाल यांनी माफी मागितली आणि पंतप्रधानांच्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणत चूक दुरुस्त केली. पण ते पुढे “हे माझ्या तोंडून चुकीचे निघाले, पण भविष्यात ते खरेही होईल,” असे म्हंटले. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरममध्ये उद्योजक सज्जन जिंदालांनी केलेलं वक्तव्य सध्या चांगलंच व्हायरल होतंय. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी 19 डिसेंबरनंतर मराठी माणूस पंतप्रधान होईल, असं भाकीत वर्तवलं होतं. नेमक्या त्याच दिवशी उद्योगपती जिंदाल यांनी केलेले विधान चर्चेचा विषय ठरला. ३. पुणेकर गारठले! थंडीचा ‘कडाका’ कायम पुणे जिल्ह्यातील किमान तापमानात दोन ते तीन अंशाने घट झाल्यामुळे थंडीचा पारा ७ अंशापर्यंत खाली आला आहे. परिणामी जिल्ह्यातील बारामती, माळीण तर शहरातील पाषाण आणि शिवाजीनगर परिसरात पुन्हा थंडीची लाट आली. मागील आठवड्यात शहरासह उपनगरातील किमान तापमान १० ते ११ अंशाच्या पुढे गेल्यामुळे थंडीचा जोर ओसरला होता. मात्र, गेल्या ४८ तासांत किमान तापमानात एक ते दीड अंशाने घट झाली. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील. किमान तापमानात फारसा बदल होणार नसून, थंडीचा काडाका कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. राजधानी एक्सप्रेसचा अपघात; अनेक हत्तींचा मृत्यू आसामच्या होजाईमध्ये राजधानी एक्सप्रेसचा शनिवारी मध्यरात्री भयंकर अपघात झाला. डीएन सैरांग-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने रेल्वे रुळ ओलांडत असलेल्या हत्तींच्या कळपाला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की अनेक रेल्वे डबे रुळावरून घसरले. रेल्वेच्या धडकेत सात हत्तींचा मृत्यू झाला असून, एक हत्ती जखमी झाला आहे. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजतेय. घटनास्थळावर तात्काळ मदतकार्य करण्यात येत आहे. लुमडिंग रेल्वे विभाग हद्दीत हा अपघात घडला. जिथे अपघात घडला ते ठिकाण गुवाहाटीपासून १२६ किमी दूर आहे. माहिती मिळताच रेल्वेची मदत व बचाव कार्य पथक तातडीने रवाना झाले. शौर्य पाटील प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन नवी दिल्लीतील सेंट कोलंबा शाळेशी संबंधित शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखालील पार पडलेल्या खासदारांच्या बैठकीनंतर अमित शहांनी विशेष तपास पथकासंदर्भात निर्देश दिले आहे. त्यानुसार एसआयटीचे नेतृत्व एसीपी रमेश लांबा करतील, तर डीसीपी आदित्य गौतम आणि उपनिरीक्षक रोहित कुमार हे या पथकात असतील. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीत शिकत असलेल्या शौर्य प्रदीप पाटील या मराठी विद्यार्थ्याने काही दिवसांपूर्वी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आपले जीवन संपवले होते. शौर्य हा मूळचा सांगली जिह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी होता. एपस्टीन फाईद्वारे ट्रम्प प्रशासन जगाला अर्धसत्यच सांगत असल्याचा आरोप अमेरिकेतील लैंगिक शोषणातील दोषी जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित फाईल्स अखेर उघड झाल्या आहेत. मात्र एपस्टीन फाईलचा काहीच भाग समोर आणल्याने आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थकही भडकले आहेत. रिपब्लिकन खासदारांनी सुद्धा या फाईल उघड करण्याची मागणी केल्याने ट्रम्प यांच्यावर मोठा दबाव आल्याची चर्चा आहे. सिनेटचे अल्पसंख्यांक नेते चक शूमर यांनी, ट्रम्प प्रशासनाने या फाईल सार्वजनिक केल्या तरी, त्यातून अर्धसत्यच समोर आल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी नागरिक आता अमेरिकेच्या न्याय विभागावर टीका करत या फाईलमधील सर्वच माहिती जगासमोर ठेवण्याची मागणी करत आहेत, . अमेरिकेचे सीरियाला प्रत्युत्तर; ISISचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेने सीरियामध्ये इस्लामिक स्टेटविरुद्ध मोठी लष्करी कारवाई सुरू केली आहे.सीरियामध्ये १३ डिसेंबर रोजी झालेल्या एका हल्ल्यात अमेरिकेच्या दोन जवानांसह एका अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यासाठी अमेरिकेने इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेला जबाबदार धरत अमेरिकन सैन्याने ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक सुरू केले आहे. अमेरिकेने सीरियातील अनेक ठिकाणांवर हवाई हल्ला केला असून ISIS चे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या ऑपरेशनचा उद्देश हा आयसिसचं नेटवर्क पूर्णपणे नष्ट करणं हा आहे, अशी माहिती अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी एक्सवर दिली आहे. तसेच त्यांनी अमेरिका आपल्या नागरिकांवर आणि सैनिकांवर हल्ले सहन करणार नाही आणि जगात कुठेही अमेरिकन लोकांना लक्ष्य करणाऱ्या कोणालाही पाठलाग करून संपवले जाईल, असा इशाराही दिला. तैवानमध्ये मेट्रो स्टेशनजवळ ग्रेनेड, चाकू हल्ला तैवानची राजधानी तैपेईमध्ये एका व्यक्तीने चाकू आणि स्मोक ग्रेनेडने लोकांवर हल्ला केला. तैपेई मेट्रो स्टेशनजवळ हा हल्ला केला. या हल्ल्यात ३ जण ठार झाले, तर पाच जण जखमी झाले. हल्लेखोराने तोंडाला रूमाल बांधला होता. तो लोकांच्या अंगावर धावून धावून हल्ला करत होता. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी हल्ला केलेल्या व्यक्तीचा पाठलाग केला, यादरम्यान त्याने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली, ज्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तैपेई स्टेशनवर, रेल्वे स्थानके, महामार्ग आणि विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आमिरच्या चित्रपटात मराठी अभिनेत्री मधुरा जोशीची वर्णी टीव्ही अभिनेत्री मधुरा जोशी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे आमिर खानसोबत झळकणार आहे.मधुरा सध्या ‘तू ही रे माझा मितवा’ या मराठी मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मधुरा जोशी ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. तिने आजवर मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. आता मधुराने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. तिने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिला संधी देणाऱ्या लोकांचे आभार मानले आहेत. मधुराच्या या बॉलिवूड सिनेमाचे नाव ‘हॅपी पटेल खतरनाक जासूस’ असे आहे. हा चित्रपट 16 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चेंडू थेट कॅमेरामनच्या हातावर अन् हार्दिक पांड्याच्या कृतीचे कौतुक भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पाचव्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कमला कामगिरी केली. हार्दिकने 25 चेंडूंत 63 धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारताने 231 धावांचा स्कोअर उभारला. मात्र या सामन्यादरम्यान हार्दिकच्या एका षटकाराचा चेंडू डगआउटजवळ उभ्या असलेल्या कॅमेरामनला लागला आणि त्याच्या हाताला दुखापत झाली. सामना संपताच हार्दिक त्या कॅमेरामनकडे गेला आणि त्याला मिठी मारली, इतकेच नाही तर ज्या ठिकाणी चेंडू लागला होता त्या डाव्या खांद्यावर स्वतः आयस पॅकही लावला. हार्दिकच्या या कृतीचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. हेही वाचा: मतदान कर्मचाऱ्यांना ‘ती’ शंका आली अन्…; सिन्नर नगरपरिषद मतदान केंद्रावरील घटनेने खळबळ, नेमकं काय घडलं?