पुणे – इंन्टाग्रामवरील मैत्रिणीसोबत मौज मजा करण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने आजीची मोहन माळ चोरली. यानंतर हे दागिने विकून दोघेही मौज मजा करत फिरत होते. मात्र वडिलांनी घरातून मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यावर खरा प्रकार उघडकीस आला.
या घटनेमुळे पालकांना मोठा धक्का बसला. ते मुलाचा ताबा घेण्यास तयार नसल्याने मुलाला बालसुधारगृहात पोलिसांनी ठेवले आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलगा आणि त्याची मैत्रिण (२४, रा.धनकवडी) हिच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आंबेगाव बुद्रुक येथे फिर्यादी रहातात. ते पीएमपीमध्ये कंडक्टर आहेत. त्याचा मुलगा ९ वी इयत्तेत शिक्षण घेतो. त्याची इंन्टाग्रामवर २४ वर्षीय तरुणीशी मैत्री झाली होती. ही तरुणी टॅटू आर्टिस्टचे काम करते. तीचे पहिल्या बॉयफ्रेंडबरोबर ब्रेकअप झाले होते.
यामुळे ती इंन्टावर नवीन मित्र शोधत होती. अल्पवयीन मुलाशी मैत्री झाल्यावर त्यांनी प्रत्यक्षात भेटण्याचे ठरवले. दरम्यान अल्पवयीन मुलाने घरातून आजीची मोहन माळ चोरली. ही मोहनमाळ दोघांनी एकत्र भेटल्यावर विकून १ लाख ३० हजार रुपये घेतले. ते दोघांनी दोघांच्या बँगमध्ये वाटून ठेवले.
यानंतर ते फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर फिरत होते. दरम्यान वडिलांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी तातडीने दखल घेत तपास सुरु केला. तेव्हा ते दोघेही एकमेकांसोबत आढळले. त्यांना ताब्यात घेऊन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, मुलाला न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे त्याच्या वडिलांनी त्याचा ताबा घेण्यास नकार दिला. यामुळे त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. मात्र पोलिसांनी वडिलांची समजूत काढून त्यांना ताबा घेण्याची विनंती केली आहे.
बालसुधारगृहात राहिल्यास तेथील इतर मुलांच्या संगतीत राहिल्यास त्याच्या मनावर आणखी काही वाईट परिणाम होऊ शकतो. त्यापेक्षा त्याचा ताबा घेऊन त्याला समुपदेशकाकडे न्यावे असे पालकांना समजावण्यात आले आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम करत आहेत.