पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागा वाटपाचा तिढा वाढतच असल्याने राज्यातील सुमारे २५ जागांवर महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील वडगावशेरी आणि इंदापूर या मतदारांचा समावेश असेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. यामध्ये जागा वाटपावर चर्चा झाली. भाजपला १६० जागा हव्या आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला उर्वरीत जागा देण्याबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादी ( अजित पवार) पक्षाला ९० जागा हव्या आहेत. तर, राज्यातील सुमारे २५ जागांवर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादींची मागणी आहे. त्यामुळे हा तिढा सोडविण्यासाठी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव पुढे आल्याची चर्चा आहे. वडगावशेरी, इंदापूरसाठी प्रस्ताव… वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी भाजपचे जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत मुळीक हे भाजपकडून इच्छूक होते. मात्र, त्यांना तिकिट नाकारण्यात आले, मुळीक हे फडणवीसांच्या जवळचे असल्याने त्यांनी या जागेचा आग्रह धरला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तर, इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांनी भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. मात्र, आता राष्ट्रवादीत पडलेल्या फूटीनंतर आजित पवार महायुतीत असल्याने ज्याचा आमदार त्याची जागा या सूत्रानुसार ही जागा राष्ट्रवादीला मिळणार आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील नाराज असून त्यांना थांबविण्यासाठी या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीचा मार्ग काढण्यात आला आहे. तुतारीला थेट फायदा ? जिल्ह्यातील या दोन मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत झाल्यास त्याचा तुतारीला थेट फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०१९ मध्ये भाजपमध्ये गेलेले माजी आमदार बापूसाहेब पठारे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर भाजपमधूनच माजी नगरसेवक अनिल टिंगरे हे ही लढण्याच्या तयारीत असून त्यांच्याही नावाची चाचपणी शरद पवार गट करीत आहे. लोकसभा निवडणुकीत इंदापूरमधून सुप्रीया सुळे यांना मताधिक्य मिळाल्याने या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये लढत झाल्यास त्याचा थेट फायदा तुतारीला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.