US Iran War : अमेरिकेकडून इराणवर नव्याने हल्ले; इराणकडून मध्यस्थीच्या प्रस्तावाचा विचार
इराणच्या अण्विक कार्यक्रमाबाबत माहिती देणाऱ्यांना २० दशलक्ष डॉलरचे बक्षिस देण्यात येईल आणि आवश्यकता भासल्यास दुसरीकडे स्थलांतराची सोय केली जाईल, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने जाहीर केले आहे.

US Iran War : अमेरिकेच्या सैन्याने शुक्रवारी इराणवर नव्याने हल्ले केले आणि इराणच्या संरक्षण प्रणालीला लक्ष्य केल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणमधील काशम बेटावरील सुझा भागात स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आल्याचे इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनेही म्हटले आहे. हे बेट तेलाची वाहतूक करणाऱ्या महत्वाच्या सागरी मार्गावरच आहे.
मात्र ट्रम्प यांनी मात्र हे हल्ले लहान असल्याचे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे. काशम बेटावर इराणने विमानविरोधी उपकरणे बसवली होती आणि आम्ही १५ मिनिटात ती उद्ध्वस्त केली, असे ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथील वेस्ट पाम बीच येथे पत्रकारांना सांगितले. मात्र या हल्ल्यांचा अन्य तपशील ट्रम्प यांनी दिला नाही.
गेल्या वर्षी जून महिन्यात अमेरिका -इस्रायलने केलेल्या बॉम्बहल्ल्यात इराणच्या हवाई संरक्षण प्रणालीचे मोठे नुकसान झाले होते. आता या हल्ल्यात या प्रणालीला नष्ट केल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पण ही प्रणाली इराणकडून पुन्हा उभारली जाईल, असा अंदाज अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
अमेरिकेच्या सैन्याने सोमवारी आत्मसंरक्षणासाठी हल्ले केले होते. तेंव्हा देखील इराणच्या मुख्यभूमीपासून जवळच असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील काशम आणि हेनगाम बेटांवर हल्ले करण्यात आले होते.
अमेरिकेतल्या मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाल्यानंतर प्रथमच शुक्रवारी इराणवर हल्ले करण्यात आले. या पराभवानंतर संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी इराणला नष्ट करण्याची धमकी दिली होती आणि युद्धावर लवकरच तोडगा काढण्याचे संकेतही दिले होते.
कतारकडून मध्यस्थीचा प्रस्ताव
अमेरिकेकडून इराणवर हल्ले केले जात असतानाच कतारने आपले मध्यस्थीचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या मध्यस्थीचा इराणकडून विचार केला जातो आहे. मात्र अमेरिकेच्या नव्या हल्ल्यांमुळे अण्विक कार्यक्रमाबाबत वाटाघाटी करायला इराण तयार नसल्याचे समजते आहे.
जोपर्यंत अमेरिकेकडून इराणच्या काही महत्वाच्या अटी मान्य केल्या जात नाहीत, तोपर्य्ंत वाटाघाटी होणार नसल्याचे इराणने म्हटले आहे. त्याऐवजी आण्विक चर्चेबाबत काही सवलती मिळण्याची अपेक्षा इराणने केली आहे.
२० दशलक्ष डॉलरचे बक्षिस
इराणच्या अण्विक कार्यक्रमाबाबत माहिती देणाऱ्यांना २० दशलक्ष डॉलरचे बक्षिस देण्यात येईल आणि आवश्यकता भासल्यास दुसरीकडे स्थलांतराची सोय केली जाईल, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने जाहीर केले आहे.
इराणच्या लष्करी सुविधा, उपकरणे आणि संबंधित अधिकाऱ्यांची माहिती, तसेच वैज्ञानिक समुदायाबद्दल किंवा कोणत्याही प्रकारच्या लष्करी हालचालींची माहिती देणाऱ्याला हे बक्षिस दिले जाईल, असेही म्हटले गेले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या रिवॉर्ड फॉर जस्टीस प्रोग्रॅमची लिंक देखील पोस्टमध्ये जाहीर करण्यात आली आहे.






