पिंपरी | मोफत शस्त्रक्रिया शिबिरात डॉ. डीवाय पाटील रुग्णालयाचा पुढाकार

पिंपरी, (प्रतिनिधी) – नॅशनल बर्न सेंटर, ऐरोली, नवी मुंबई येथे होणाऱ्या मोफत शस्त्रक्रिया शिबिरात पिंपरीतील डॉ. डीवाय पाटील रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे तज्ज्ञ डाॅक्टर पुढाकार घेऊन आपले योगदान देणार आहेत.
आगीच्या घटनांमध्ये भाजलेल्या रुग्णांच्या जखमांवर उपचार तसेच मोफत सुधारात्मक शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. 30 आणि 31 मार्च २०२४ रोजी हे शिबिर होणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
मोफत तपासणी व शस्त्रक्रियेसंदर्भातील पूर्वतपासणी तसेच नाव नोंदणी सोमवार ते शनिवार, दुपारी 2 ते 4 वाजता होणार आहे. तसेच मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे मुख्य आयोजन 30 आणि 31 मार्च 2024 रोजी नॅशनल बर्न सेंटर, ऐरोली, नवी मुंबई येथे संपन्न होणार आहे. डॉ. डीवाय पाटील रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे येथील तज्ज्ञ प्लॅस्टिक सर्जन या शिबिरात आपले योगदान देत आहेत.
या बाबत प्लॅस्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. गुरुस्वामी विश्वनाथ म्हणाले की, आगीच्या भीषण अपघातांमधून वाचलेल्यांना त्यांचे जीवन परत मिळवून देण्यात मदत करण्याचा प्रवास प्रेरणादायी आहे. सामूहिक प्रयत्न आणि पाठिंब्याद्वारे या शिबिराचे आयोजन होत आहे. याद्वारे शिबिरार्थींना नक्कीच फायदा मिळेल व त्यांना सक्षम करण्याचे आमचे ध्येय या माध्यमातून पूर्ण होईल.





