पिंपरी | मुलींसाठी मोफत इंजीनियरिंग आणि ऑटोमेशन डिप्लोमा

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि सिंबायोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठ किवळे यांच्या वतीने एक वर्षांपूर्वी गरजू मुलीं करिता दोन प्रकारचे डिप्लोमा कोर्सेस चालू केले आहेत. ते पूर्णपणे मोफत व निवासी असून दहावी व बारावी पीसीएम केलेल्या मुलींना यामध्ये प्रवेश मिळतो.
डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स हा दहावी नंतरचा डिप्लोमा आहे. तर, डिप्लोमा इन मनुफॅक्चरिंग ऑटोमेशन हा बारावी नंतरचा डिप्लोमा आहे. मागच्या वर्षी प्रवेश घेतलेल्या मुली सध्या चाकण मधील एका कंपनीमध्ये ऑन द जॉब ट्रेनिंग घेत आहेत. त्यांना ट्रेनिंगमध्ये स्टायपेंडही मिळत आहे, अशी माहिती महापालिकेने दिली.
हे डिप्लोमा कोर्सेस जर्मन ड्युअल मोडच्या पद्धतीप्रमाणे शिकवले जातात. जास्तीत जास्त वेळ मुलींना प्रॅक्टिकल व ऑन द जॉब ट्रेनिंगमध्ये घालवता येतो. चाकण व पिंपरी-चिंचवडमधील विविध कंपन्या या मुलींना इंटर्नशिप व फायनल प्लेसमेंट देण्यास उत्सुक आहेत.
ज्या मुली महापालिकेच्या हद्दीत राहतात त्यांच्यासाठीचा ट्रेनिंग व राहण्या खाण्याचा खर्च पालिका करते. यामुळे शहरातील मुली सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग व वाहन उद्योगांमध्ये रोजगार क्षम बनून कुटुंबीयांना मदत करतील. या उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून ३० जुलै पर्यंत अर्ज करू शकतात. त्यासाठी महापालिकेच्या समाज विकास विभागामध्ये, सिंबायोसिस कौशल्य विद्यापीठ किवळे येथेही मुलींना याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेने कळविली आहे.
या उपक्रमाअंतर्गत शिकण्याची जिद्द, आकांक्षा बाळगणाऱ्या विद्यार्थीनी कुशल बनतील आणि त्यातून त्यांच्या सक्षमीकरणास मदत होईल. याद्वारे त्यांना विविध क्षेत्रांमध्ये आपले करिअर घडविण्याची संधी मिळेल आणि नेतृत्व करण्याची क्षमताही त्यांच्यामध्ये निर्माण होईल. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक,
एक सक्षम मुलगी हीच एक सक्षम समाज घडवू शकते, याच कारणाने आम्ही हे दोन वर्षांचे डिप्लोमा कोर्सेस दरवर्षी आर्थिक दुर्बल घटकांमधून येणाऱ्या मुलींकरिता चालवतो. – डॉ. स्वाती मुजुमदार, प्रकुलपती, सिंबायोसिस कौशल्य विद्यापीठ
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सिंबायोसिस कौशल्य विद्यापिठाच्या संयुक्त विद्यमाने मोफत रोजगारभिमुख कौशल्य प्रशिक्षण मिळत आहे. सोयीसुविधा, नेहमी पाठिशी उभे राहणाऱ्या शिक्षकांमुळे आमचे भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल, याची खात्री वाटते. – पल्लवी शिंदे, विद्यार्थिनी, सिंबायोसिस कौशल्य विद्यापीठ





