मुलींना केजीपासून पीजीपर्यंत मोफत शिक्षण देणार – अखिलेश

प्रयागराज – उत्तर प्रदेशातील भाजपचे सरकार युवक आणि शेतकऱ्यांचा अपमान करत आहे, असा आरोप समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज केला. उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीला विजय मिळाला तर राज्यातील युवकांना 11 लाख रोजगार दिले जातील आणि मुलींना केजीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत मोफत शिक्षण दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
नुकत्याच संपलेल्या चौथ्या टप्प्यानंतर आपल्या पक्षाला बहुमत मिळणार आहे, हे स्पष्ट झाले आहे, असा विश्वासही अखिलेश यांनी व्यक्त केला.
समाजवादी पार्टीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्यात येईल आणि जाती आधारित जनगणना उत्तर प्रदेशात केली जाईल, असे आश्वासनही अखिलेश यादव यांनी हदिया येथील प्रचार सभेमध्ये बोलताना दिले. शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीजपुरवठा आणि इंटरमिजिएटपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या मुलींना 36 हजार रुपये देण्याच्या आश्वासनाचा त्यांनी पुनरुच्चार केला.
आपल्या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. ही विधानसभेची निवडणूक राज्यघटना वाचवण्यासाठीची निवडणूक आहे. भाजप नेत्यांकडून नेहमीच “डबल इंजिन’बाबत जनतेला खोटी आश्वासने दिली आहेत. प्रत्यक्षात भाजपच्या सरकारने जनतेला महागाई आणि बेरोजगारीच दिली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.





