पुणे | विद्यार्थिनींना विनाशुल्क प्रवेश ; ”प्रभात’च्या पाठपुराव्यानंतर राज्य शासनाचे आदेश

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार विद्यार्थिनींकडून शिक्षण संस्थांनी प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क घेता कामा नये. त्यानंतरही महाविद्यालय अथवा संस्थांनी प्रवेशाच्या वेळी मुलींकडून शिक्षण शुल्काचा भरणा करुन घेतल्यास, ती रक्कम संस्थेने विद्यार्थिनींना परत करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्क मोफत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क न घेता प्रवेश देणे अनिवार्य आहे. मात्र काही शिक्षण संस्था विद्यार्थिनींना प्रवेश देताना शिक्षण शुल्क भरण्याचा आग्रह करीत आहेत.
तसेच, शुल्क भरल्याशिवाय प्रवेश देत नसल्याच्या तक्रारी, पालक, विविध संघटना व लोकप्रतिनिधी यांच्याकडून येत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शुक्रवारी परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार प्रवेशाच्या वेळी मुलींनी पैसे भरल्यास, ते मुलींना तत्काळ परत करावे, असे स्पष्ट निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शिक्षण संस्थांना दिले आहेत.
ईबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी व ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश देताना त्यांच्याकडून शिक्षण शुल्क आकारण्यात येऊ नये.
प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम भरण्याचा आग्रह करण्यात येऊ नये. संपूर्ण शुल्क भरण्याचा आग्रह धरल्यास किंवा मागणी केल्यास अशा शिक्षण संस्थांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता शुल्क भरण्याचा आग्रह शिक्षण संस्थांना महागात पडणार आहे.
परीक्षा शुल्क भरावे लागणार, पण परत मिळणार
मुलींना शिक्षण शुल्क माफीचा निर्णय झाला. परंतु परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पात्र विद्यार्थिंनींना परीक्षा शुल्काच्या रकमेचा भरणा करावा लागेल.
त्यानंतर संबंधित तंत्रशिक्षण व उच्च शिक्षण विभागाने परीक्षा शुल्काची रक्कम अर्ज केलेल्या विद्यार्थिनींच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात जमा करावी, असेही राज्य शासनाने परिपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, शिक्षण शुल्काची रक्कम महाविद्यालयाच्या बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे.
काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश
तंत्रशिक्षण संचालनालय, उच्च शिक्षण संचालनालय व कला संचालनालय या विभागांनी त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व शिक्षण संस्था, विद्यापीठांना विद्यार्थिंनीना विनाशुल्क प्रवेश देण्याच्या निर्णयाचे अंमलबजावणी करण्याचे निर्देश द्यावेत. या सूचनांचे पालन न करणाऱ्या संस्थांना समज द्यावी व सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याचे आदेशाही राज्य शासनाने दिले आहेत.





