Pune Andekar gang : “बदला तो फिक्स, आता फक्त…; आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ भडक पोस्ट्स”, पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा

पुणे : आंदेकर टोळीविरोधातील पोलिस कारवाईनंतर त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर भडक संदेश पोस्ट करून कायदा-सुव्यवस्थेला आव्हान दिले आहे. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी तत्पर कारवाई करत पाच आरोपींना अटक केली असून त्यांची पोलिसांनी धिंड काढली आहे. मंथन सचिन भालेराव, फैजान शेख, पियुष बिडकर, अथर्व नलावडे, ओंकार मेरगु असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
समर्थ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी इंस्टाग्राम अकाउंटवर “Badla to fix, reply hoga. Aata fakt body moza kutryano” असा उचकावणारा स्टेटस ठेवून आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ हिंसक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणातील पाचही आरोपींना शनिवारी (दि. ४ ऑक्टोबर) अटक करण्यात आली आहे. हे आरोपी आंदेकर टोळीशी सोशल मीडियाद्वारे जोडलेले असून, पोलिसांच्या अलीकडील कारवाईनंतर त्यांनी सूडभावनेतून भडक पोस्ट्स टाकल्या होत्या, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
तपास अधिक गतीने सुरू असून, आरोपींनी हे पोस्ट्स कोणत्या गटाच्या किंवा व्यक्तीच्या सांगण्यावरून टाकले, तसेच आंदेकर टोळीशी त्यांचा नेमका संबंध किती खोलवर आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अशा प्रकारचे पोस्ट टाकणे हे केवळ कायद्याचा अनादर नाही, तर सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न आहे. सोशल मीडियावर द्वेषपूर्ण किंवा हिंसाचाराला प्रवृत्त करणारे संदेश पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असे ते म्हणाले.




