पिंपरी – बनावट शेअर मार्केट ॲप्लिकेशनद्वारे गुंतवणुकीचे आमिष दाखवून आणि वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगून एक कोटी सात लाख ३७ हजार ८८५ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ऑनलाइन पद्धतीने घडली.या प्रकरणी एका व्यक्तीने शनिवारी (दि. २६) सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शेरॉन त्रिवेदी आणि मेहुल गोयल तसेच नऊ बँक खाते धारक व ऍप्लिकेशन धारक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींना आरोपी शेरॉन याने एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केले. त्या ग्रुपवर एक लिंक पाठवून त्याद्वारे फिर्यादींना एक बनावट शेअर मार्केट ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. व्हॉट्सॲप ग्रुपचे ॲडमिन आरोपी शेरॉन आणि मेहुल यांनी त्या ॲपद्वारे गुंतवणूक केल्यास चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून शेअर ट्रेडिंगकरिता वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. एकूण ४ कोटी इतका आभासी परतावा आरोपींनी फिर्यादीला दाखवला. तसेच फिर्यादींना त्यांची रक्कम काढण्याकरिता वेगवेगळे सर्व्हिस चार्ज, सर्व्हिस टॅक्स भरण्यास सांगितले. यामध्ये आरोपींनी एकूण एक कोटी सात लाख ३७ हजार ८८५ रुपये रक्कम भरण्यास भाग पाडून ते पैसे परत न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. सायबर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.