पुणे | “दाऊद’च्या नावे पुण्यात फसवणूक
पुणे ,{प्रभात वृत्तेसवा} – “दाऊद इब्राहिमशी संबंधित राज्यातील मंत्र्यामार्फत काळा पैसा व्यवहारात आणला आहे,’ अशी भीती सायबर चोरट्यांनी दाखवत उत्तमनगर भागातील नागरिकाची ३५ हजारांची फसवणूक केली.
फिर्यादीनुसार राहुल राॅय असे खोटे नाव वापरुन फसवणूक करणाऱ्या चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर राॅयने संपर्क साधला. फेडेक्स कुरिअर कंपनीतून बोलत असल्याची बतावणी त्याने केली. तुमच्या नावे परदेशातून पाकीट आले आहे.
“मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने ते जप्त केले आहे. त्यात पाच बनावट पासपोर्ट, क्रेडिट कार्ड, लॅपटाॅप, अमली पदार्थ सापडले आहेत. काळा पैसा व्यवहारात गुंड दाऊद इब्राहिम टोळीशी महाराष्ट्रातील एका मंत्र्याचा संबंध आहे.
तुमच्या नावाचे आधार कार्ड मंत्री वापरत आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून याप्रकरणाची चौकशी सुरू असून, तातडीने ३५ हजार रुपये बँक खात्यात पाठवा,’ असे चोरट्याने सांगितले. तक्रारदाराने ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा केले. चौकशीत फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम तपास करत आहेत.




