जळगाव: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जळगावमधील माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरोधात देवगिरी नागरी सहकारी बँकेची ५ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. उमंग व्हाईट गोल्ड कंपनीच्या कर्जावरून हा गुन्हा दाखल झाला असून, बँकेकडे गहाण ठेवलेली मशिनरी विकल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणात उन्मेष पाटील यांना कधीही अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, देवगिरी बँकेने राजकीय संगनमत आणि सूडबुद्धीने हा खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा उन्मेष पाटील यांनी केला आहे. उन्मेष पाटलांचा बँकेवर सूडबुद्धीचा आरोप – “बँकेने ज्या कंपनीला कर्ज दिले, त्या कंपनीच्या संचालक मंडळात मी नाही, मी त्या कंपनीचा भागीदारही नाही. मी फक्त जामीनदार होतो आणि म्हणूनच माझ्यावर गुन्हा दाखल करून मला नंबर एकचा आरोपी बनवले आहे,” असे पाटील म्हणाले. राजकीय द्वेषातून हा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप त्यांनी केला. पाटील यांनी यावेळी पार्थ पवार आणि गिरीश महाजन यांच्या कुटुंबाचे नाव घेत, इतरांवर गुन्हा दाखल होत नाही, मग मी जामीनदार असतानाच माझ्यावर का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी ‘बीएचआर’ आणि ‘वरद इन्फ्रा’ कंपन्यांचा उल्लेख करत भाजप नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. ‘बीएचआर’वर बोलल्याने गुन्हा – “मी ‘बीएचआर’वर बोलल्यामुळे यांना झोंबले आणि तीन दिवसांत माझ्यावर गुन्हा दाखल झाला,” असे सांगत पाटील यांनी गुन्हा दाखल होण्याच्या वेळेवर आक्षेप घेतला. आमदार मंगेश चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, तसेच बँक चेअरमन आणि अधिकाऱ्यांचे CDR (कॉल डेटा रेकॉर्ड) तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे. भाजपशी वैर नसून, भाजपमधील ‘या प्रवृत्ती’विरोधात आपला लढा असल्याचे पाटील म्हणाले. “ही प्रवृत्ती बदला घेण्यामध्ये मग्न आहे,” असा आरोप त्यांनी केला. अखेरीस, “जितका मोठा संघर्ष, तेवढा मोठा विजय,” असे म्हणत उन्मेष पाटील थांबणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.