वन्यप्राण्यांपासून नुकसान टाळण्यासाठी फॉक्सलाइट प्रभावी

वाईल्डलाईफ कन्झर्वेशन ट्रस्ट माध्यमातून गावांमध्ये लावण्यात येते फॉक्सलाईट
पुणे – मानव व वन्यप्रण्यांमधील संघर्ष तसेच शेतीचे नुकसान अशा विविध बाबी टाळण्याकरिता फॉक्सलाईट ही प्रकाशयोजना प्रभावी ठरत आहे. विदर्भानंतर या प्रणालीचा सिंधुदुर्गात वापर केला जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आता बिबट्यांचा वावर असलेल्या जुन्नर तालुक्यात याचा वापर केल्यास बिबट्याचे हल्ले रोखले जाऊ शकतात.
शेतीमध्ये आलेले उभे पीक वन्यप्राण्यांकडून फस्त करण्याच्या घटनांनी शेतकरी त्रासलेला आहे. विदर्भात रानडुकर, नीलगाय, चितळ या प्राण्यांपासून हा धोका अधिक तीव्र झाला आहे. राज्य सरकारच्या वतीने व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाउंडेशन हा उपक्रम राज्यात राबविला जातो. या उपक्रमाच्या माध्यमातून वन्यजीव संवर्धन संस्थेच्या वतीने (वाईल्डलाईफ कन्झर्वेशन ट्रस्ट-(डब्ल्यूसीटी) च्या माध्यमातून विदर्भातील गावांमध्ये वन्यजीवांपासून होणारा त्रास टाळण्याकरिता फॉक्सलाईट लावण्यात आल्या आहेत.
काही ठिकाणी अशा वन्यप्राण्यांपासून शेतीच्या बचावासाठी संरक्षक तारांमध्ये विजेचा प्रवाह सोडण्याचे प्रकार शेतकऱ्यांकडून होतात. त्यामुळे अनेक वन्यप्रण्यांचा हकनाक बळी जातो. तर दुसरीकडे शेतीचे होणारे नुकसान टाळण्याचे मोठे आव्हान वनखात्यासमोर असते. या मधून व्यवहार्य मार्ग काढण्यासाठी ब्रह्मपुरी वनविभागाच्या वतीने काही गावांलगतच्या शेतीजवळ फॉक्सलाईट लावल्याने नीलगाई व रानडुकरांचा वावर कमी झाल्याचे प्रमाण आढळले. तर काहीठिकाणी तर हे वन्यजीव फिरकले देखील नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
काय आहे फॉक्सलाईट?
ही एक लहान यंत्रणा आहे. यामध्ये अगदी लहान आकाराचे (राईस बल्ब) प्रकाश दिवे आहेत. या दिव्यांमधून विविध रंगांचा प्रकाश बाहेर पडतो. वन्यप्राण्यांच्या उंचीनुसार हा प्रकाश त्यांचा डोळ्यांवर पडेल, असे त्याचे नियोजन केले जाते. हा प्रकाश वन्यप्राण्यांच्या डोळ्यांवर पडल्याने ते शेताकडे फिरकत नाहीत. विशेष म्हणजे ही सर्व यंत्रणा सौर ऊर्जेवर चालत असल्याने ती खर्चिक नाही.





