Foxconn : “अजूनही वेळ गेलेली नाही, फोडाफोडीचे राजकारण सोडून..”; रोहित पवारांचे राज्यसरकारला आवाहन

मुंबई :- गुजरातमध्ये होऊ घातलेल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला धक्का बसला आहे. फॉक्सकॉन कंपनीने वेदांतासोबतचा करार समाप्त केल्याचे जाहीर केले आहे. यामुळेे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरेलला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला.
फॉक्सकॉनने निवेदन जारी करून कंपनी संयुक्त करारनाम्यातून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. याठीच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार जबाबदार असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांनी यासंबंधीत ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, “Foxconn समूहाने वेदांता सोबतच्या भागीदारीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. सेमीकंडक्टरचा हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. परंतु केवळ गुजरातच्या निवडणुकांसाठी केंद्र सरकारने हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेला. तेव्हाच वस्तुस्थितीचे भान ठेवून केंद्र सरकारने निर्णय घेतला असता तर कदाचित आज Foxconn ने माघार घेतली नसती. असो यास जेवढे केंद्र सरकार जबाबदार आहे त्यापेक्षा अधिक जबाबदार महाराष्ट्र सरकार देखील आहे, असं पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवार पुढे म्हणतात की, महाराष्ट्रासारख्या राज्यात गुंतवणुकीच्या संधीस Foxconn कदापि नकार देऊ शकणार नाही, त्यामुळे राज्य सरकारने प्रयत्न करण्यास हरकत नाही.
अजूनही वेळ गेलेली नाही, फोडाफोडीचे राजकारण सोडून आता तरी युवकांच्या उज्वल भविष्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला हवेत. युवकांच्या भविष्याची काळजी नसेल तर किमान येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन तरी प्रयत्न करा, असं आवाहन रोहित पवार यांनी राज्य सरकारकङे केली आहे.
सेमिकंडक्टरची केली जाणार होती निर्मिती…
वेदांता ग्रुपसोबतच्या भागीदारीतील प्रकल्पातून फॉक्सकॉन कंपनी बाहेर पडणार आहे. गेल्या वर्षी वेदांता आणि फॉक्सकॉन यांनी एकत्र येत गुजरातमध्ये 19.5 बिलियन डॉलर गुंतवणुकीचा करार केला होता.
यातून सेमिकंडक्टरची निर्मिती केली जाणार होती. दरम्यान तैवानस्थित फॉक्सकॉननं आपण या प्रकल्पातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलंय. गेल्या वर्षी सत्तांतर नाट्यादरम्यान हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला होता.





