Shirur News : मागील सहा महिन्यांतील चौथी घटना! बेट भागात शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या केबलची चोरी

जांबुत: शिरूर तालुक्याच्या बेट भागात दिवसेंदिवस चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. बुधवार (दि. २७) रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी चोरी करून काठापूर खुर्द (ता. शिरूर) येथील सहा शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या केबलची चोरी होण्याची घटना घडली आहे.
मागील सहा महिन्यात जांबुत, पिंपरखेड, काठापूर खुर्द परिसरातील कृषिपंप व केबलचोरीची चौथी घटना आहे. मात्र अशा प्रकारे होत असलेल्या चोरीच्या घटनांतील चोरट्याचा शोध घेण्यास पोलीस प्रशासनाची हतबलात दिसून येते. मागील आठवड्यात देखील अशाच प्रकारे याच परिसरातून केबल चोरी होण्याची घटना घडून आली होती.
काठापूर खुर्द (ता. शिरूर ) येथील शेतकरी दामोदर पोपट पाबळे, रोहित बाळासाहेब दाते, मनोहर धोंडिबा पवार, रघुनाथ लहू दाते, पूनम संदीप राहुटे व गणेश जिजाबा दाते यांच्या घोडनदी काठावरील कृषीपंपाच्या केबलची चोरी झाल्याने शेतकऱ्यांचे सुमारे ८० ते ९० हजारांचे नुकसान झाले असून वारंवार अशा प्रकारे होणाऱ्या कृषीपंप चोरी, केबल चोरी करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान पोहचविणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळण्याची मागणी परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.
बेट भागातील पिंपरखेड, जांबुत, काठापूर खुर्द या गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, मका, बिट अशा प्रकारची तरकारी पिके घेत असतात. तसेच या भागात उसाचे क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात लागवडीखाली आले असल्याने नदीवरून पाणी उचलून पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांना आपल्या शेतात आणावे लागत आहे.
एका बाजूला बिबट्याच्या भीतीपोटी रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने धोक्याचे असून दिवसा शेतकऱ्यांना मुबलक वीज मिळत नाही. परिणामी पिकांना पाणी देण्याचे वेळपत्रक कोलमडून जात असल्याचे दिसून येते. मात्र अशातच शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या अशा प्रकारच्या कृषीपंप व केबलचोऱ्या झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठी अडचण निर्माण होत असल्याचे वास्तव असून शेतकऱ्यांना यामुळे दुहेरी संकटाना तोंड द्यावे लागत आहे.
या घटनाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस प्रशासनाने रात्रीच्या वेळी गस्त वाढविणे गरजेचे असून अशा प्रकारे चोऱ्या करून शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.





