मोठी बातमी : राष्ट्रवादीचे चौदा नगरसेवक सहा वर्षासाठी निलंबित, जाणून घ्या कारण

उस्मानाबाद – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तब्बल चौदा नगरसेवकांना पुढील सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. या सर्व नगरसेवकांवर पक्षाच्या विरोधात काम करत असल्याचे आरोप आहेत. निलंबणाची कारवाई करण्यात आलेल्यामध्ये तुळजापूरचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांचेही नाव आहे. राष्ट्रवादीने जिल्ह्यातील झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. निलंबणाच्या कारवाईनंतर उस्मानाबाद मध्ये राजकीय चर्चांना उधान आले आहे.
राष्ट्रवादीने निलंबित केलेल्यांमध्ये नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्यासह विनोद गंगणे, औदुंबर कदम,नगरसेविका अर्चना विनोद गंगणे, अश्विनी रोचकरी ,चंद्रकांत कणे, मंजुषा देशमाने, किशोर साठे,विजय कंदले,रेशमा गंगणे, वैशाली कदम,भारती गवळी, पंडित जगदाळे, आशाताई विनोद पलंगे यांची नावे आहेत. राष्ट्रवादीकडून एक परिपत्रक यासंदर्भात काढण्यात आले आहे.
जिल्हा निरीक्षक रमेश बारस्कर यांच्या बैठकीत माजी आमदार राहुल मोटे,ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, प्रदेश चिटणीस सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, हे चौदा नगरसेवक तुळजापूर विधानसभेचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हे नगरसेवक पाटील यांच्यासबोत काम करत होते. तसेच २०१९ पक्षाच्या कोणत्याही बैठकीस हजर राहिले नसल्याकराणाने ही कारवाई करण्यात आली आहे.





