पुणे जिल्हा | जुन्नरमधील चार तीर्थक्षेत्रांना क वर्ग दर्जा

नारायणगाव, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील चार तीर्थक्षेत्रांना राज्य शासनाने क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला असल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
लोकप्रतिनिधींकडून मोठ्या देवस्थानांना मकफ वर्ग तिर्थक्षेत्र योजनांतर्गत दर्जा देण्याची मागणी वाढत असून राज्य सरकारनेही अनेक मोठ्या तीर्थक्षेत्रस्थळांना जास्तीत जास्त मान्यता दिली आहे.
जुन्नर तालुक्यातील 7 तीर्थक्षेत्रांना क वर्ग दर्जा देण्याबाबत आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यापैकी 4 तीर्थक्षेत्रांना क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देण्यात आला आहे.
यामध्ये श्रीक्षेत्र महालक्ष्मी देवस्थान उंब्रज नं.1, श्रीक्षेत्र मुक्ताबाई जगदंबा मंदिर देवस्थान खोडद, श्री सिद्धेश्वर मंदिर बोरी बुद्रुक, श्री श्रीराम पंचायतन ट्रस्ट गुंजाळवाडी (आर्वी) तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
देवस्थानांना दर्जा देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या समितीने सर्व प्रस्तावांची छाननी करून पात्र असलेल्या स्थळांस क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देण्याबाबतची कार्यवाही करावी असे सुचविले होते.
याबाबत अंतिम मान्यता घेण्याबाबतची सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली होती. त्यानुसार जुन्नर तालुक्यातील 4 तीर्थक्षेत्रांना क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देण्यात आला आहे.





