Anilkumar Pawar : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांसह चौघे ईडीच्या ताब्यात

वसई : वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह चार जणांना ईडीने ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये वाय एस रेड्डी, सीताराम गुप्ता, अरुण गुप्ता यांचा देखील समावेश आहे. याआधी अनिलकुमार पवार आणि त्यांच्या पत्नीची ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली होती. 29 जुलैला अनिलकुमार पवार यांच्या वसईतील निवासस्थानासह १२ ठिकाणी ईडीने छापे टाकले होते.
नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारती प्रकरण घोटाळ्यानंतर वसई- विरार शहरात ईडीचे धाड सत्र सुरू आहे. सुरूवातीला ईडीने प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रींग कायद्याअन्वये तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या हैद्राबाद येथील घरावर छापे घातले होते. यात रेड्डी यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचे घबाड हाती लागले होते. त्यापाठोपाठ २९ जुलैला ईडीने याप्रकरणी वसई- विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी छापे टाकले. त्यात १ कोटी ३३ लाख रुपये व कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.
याशिवाय ईडीने केलेल्या तपासात शहरात बांधकाम व्यावसायिकांकडून परवानगी देण्यासाठी प्रति चौरस फुटा मागे पैसे घेतले जात होते. यात अनिलकुमार पवार यांना फुटा मागे २५ रुपये तर नगररचना संचालक यांना १० रुपये अशा स्वरूपात एकूण ३५ रुपये प्रतिचौरस फुटामागे आकारले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.





