Indian Army : भारतीय लष्करातील 2 कॅप्टनसह चौघे शहीद; जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये चकमक

Indian Army – जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी जोरदार चकमक झडली. त्या चकमकीत 2 कॅप्टनसह भारतीय लष्करातील चौघांना वीरमरण आले. त्याशिवाय, मेजरसह दोघे जखमी झाले.
दहशतवाद्यांच्या अस्तित्वाची माहिती मिळाल्यानंतर राजौरीमधील जंगलात सुरक्षा दलांनी रविवारपासून संयुक्त शोधमोहीम हाती घेतली. त्या मोहिमेत लष्करी जवान आणि पोलीस सहभागी झाले.
मोहिमेत सहभागी सुरक्षा जवान आणि दहशतवादी बुधवारी आमनेसामने आल्यानंतर चकमकीला तोंड फुटले. त्यामध्ये लष्कराचे 2 कॅप्टन, हवालदार आणि जवानासह चौघे शहीद झाले.
चकमकीत जखमी झालेल्या मेजर आणि जवानाला उपचारासाठी उधमपूरमधील लष्करी रूग्णालयात हलवण्यात आले. चकमक सुरू झाल्यानंतर घटनास्थळी सुरक्षा दलांचे अतिरिक्त बळ पाठवण्यात आले.
सुरक्षा जवानांनी 2 दहशतवादी दडले असलेल्या ठिकाणाला वेढा घातला. जवानांच्या माऱ्यात दहशतवादी जखमी झाल्याचे समजते. मात्र, मोठा शस्त्रसाठा दिमतीला असल्याने त्यांच्याकडून अंदाधुंद मारा सुरू होता.
चकमकीत सामील दहशतवादी स्थानिक नसून परदेशी नागरिक असल्याचा अंदाज आहे. चकमक झडलेल्या ठिकाणापासून जवळच एक गाव आहे. त्यामुळे सुरक्षा दलांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून ग्रामस्थांना घरांबाहेर न पडण्याची सूचना केली.
जम्मू विभागात चालू वर्षी दहशतवादाशी संबंधित घटनांमध्ये 46 जण मृत्युमुखी पडले. त्यामध्ये 14 शहीद जवानांचा आणि 7 नागरिकांचा समावेश आहे. त्याशिवाय, सुरक्षा दलांनी 25 दहशतवाद्यांचा खात्मा केला.





