Youth Awards : चार भारतीयांना राष्ट्रकुल युवा गौरव पुरस्कार; जाणून घ्या त्यांच्याबदल…

नवी दिल्ली : – कॉमनवेल्थ देशांतील सामाजिक उद्योजक, पर्यावरण क्षेत्रातील दिग्गज, नवसंशोधक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या 50 जणांच्या यादीत चार भारतीय तरुणांचा समावेश करण्यात आला आहे. 15 ते 29 वयोगटातील हे तरुण शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रत्यक्ष योगदान देतात.
वातावरण बदलातील कृतीशील कार्याबद्दल अक्षय मकर, लिंग समानतेविषयी कार्य केल्याबद्दल सौम्या डबरीवाल, शाश्वत शहरे आणि समुदाय विकासात काम केल्याबद्दल कौशल शेट्टी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणात काम केल्याबद्दल श्रुतिका सिलस्वाल या चौघांची निवड या पुरस्कारासाठी झाली आहे.
स्कॉटलंड येथील कॉमनवेल्थ सेक्रेटरी-जनरल बॅरोनेस पॅट्रिशिया म्हणाल्या की, कॉमनवेल्थ युवा वर्षात 50 तरुण नेत्यांची निवड जाहीर करताना मला विशेष आनंद होत आहे. प्रत्येक वर्षी हे तरुण आपल्या सर्वांसाठी एक चांगले जग निर्माण करण्यासाठी आपले योगदान देत आहेत.
अक्षय मकर हे क्लायमेंझा सोलरचे सीईओ आहेत. औद्योगिक क्षेत्र डिकार्बोनाइज करण्यासाठी काम करण्यासाठी त्यांनी कोका-कोला, टाटा ग्रुप आणि युनिलिव्हर यांसारख्या आघाडीच्या जागतिक कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे.
सौम्या डबरीवाल ही डेव्हलपमेंट प्रॅक्टिशनर आहे आणि वारविक विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवीधर आहे. घानामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करत असताना, तिने मुलींना त्यांच्या मासिक पाळी दरम्यान संरक्षणासाठी “प्रोजेक्ट बाला’ हा उपक्रम सुरू केला. त्यामुळे मासिक पाळीच्या स्वच्छतेशी संबंधित अभिनव उपाय योजता येतात.
कौशल शेट्टी हे नॉस्टोस होम्स या स्वयंसेवी संस्थेचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. नैसर्गिक आपत्तींमुळे विस्थापित झालेल्या लोकांसाठी कायमस्वरूपी आपत्कालीन निवारे ही संस्था तयार करते.
तर श्रुतिका सिल्सवाल ही दलाई लामा फेलो आणि उत्तराखंडमधील सिंपल एज्युकेशन फाउंडेशनच्या कार्यक्रम प्रमुख आहेत. ही संस्था पाच शाळांमधील 200 हून अधिक सरकारी शाळेतील मुलांना संबंधित आणि शाश्वत शाळा अपग्रेडेशन कार्यक्रम राबवून मदत करत आहे.

