जयपूर: राजस्थानमधील आमदार म्हणून अपात्र ठरण्याची टांगती तलवार डोक्यावर असणारे कॉंग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थकांना शुक्रवारी चार दिवसांचा दिलासा मिळाला.
पायलट आणि त्यांचे समर्थक मिळून 19 आमदारांना याआधीच अपात्रतेच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यावर मंगळवारी सायंकाळपर्यंत राजस्थान विधानसभेच्या सभापतींना कुठली ऍक्शन घेता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात पायलट आणि त्यांच्या समर्थकांनी बंडाचे निशाण फडकावले. त्यामुळे राजस्थान कॉंग्रेसमधील सत्तासंघर्ष तीव्र बनला. कॉंग्रेसने पायलट यांचे पंख छाटताना त्यांची उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदांवरून हकालपट्टी केली.
त्यापाठोपाठ विधानसभेचे सभापती सी.पी.जोशी यांनी पायलट आणि त्यांच्या समर्थकांना अपात्रतेच्या नोटिसा बजावल्या. त्या नोटिसांना आव्हान देत पायलट आणि समर्थकांनी राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर शुक्रवारी झालेली सुनावणी अपूर्ण राहिली. पुढील सुनावणीसाठी न्यायालयाने सोमवारी सकाळी 10 ची वेळ निश्चित केली.
त्याआधी सभापतींच्या वतीने न्यायालयात नोटिसांवरील पुढील निर्णय मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत घेतला जाणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली. संबंधित प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा सभापती करणार असल्याचे त्यावरून सूचित झाले. आता न्यायालयाच्या निकालाकडे राजस्थानच्या आणि राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.