Crime News : चार गावठी पिस्टल्स, १५ जिवंत काडतुसे जप्त
Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली पोलिसांच्या तपास पथकाला गोपनीय बातमीदाराकडून गोव्याहून दोन व्यक्ती केसनंद परिसरात केटीएम दुचाकीवरून येणार असून, ते आकाश मोरे याच्याकडून पिस्टल खरेदी करणार असल्याची माहिती मिळाली होती.

वाघोली : केसनंद (ता. हवेली) येथे गावठी पिस्टल विक्रीसाठी आलेल्यांचा डाव वाघोली पोलिसांच्या तपास पथकाने उधळला. गोव्याहून पिस्टल विकत घेण्यासाठी आलेल्या दोघांसह पिस्टल विकणाऱ्या अशा चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईत चार गावठी बनावटीची पिस्टल्स, १५ जिवंत काडतुसे, दोन दुचाकी, तीन मोबाईल फोन आणि २० हजार रुपये रोख असा एकूण ४ लाख १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोमवारी (दि. १६) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास जोगेश्वरी पॅलेस परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली पोलिसांच्या तपास पथकाला गोपनीय बातमीदाराकडून गोव्याहून दोन व्यक्ती केसनंद परिसरात केटीएम दुचाकीवरून येणार असून, ते आकाश मोरे याच्याकडून पिस्टल खरेदी करणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने दोन टीम तयार करून जोगेश्वरी पॅलेस परिसरात सापळा रचला. सकाळी सव्वाअकराच्या सुमारास संशयित दुचाकीवरून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडले.
गोवा आणि मध्य प्रदेश कनेक्शन उघड
झडती घेतली असता, आकाश उर्फ गज्ज्या अशोक मोरे (वय २१, रा. वडगावशेरी) याच्याकडे चार गावठी बनावटीची लोखंडी पिस्टल्स, एक रिकामी मॅगझीन व १५ जिवंत काडतुसे आढळली. त्याच्यासोबत असलेल्या एका १७ वर्षीय विधिसंघर्षित बालकाकडे नंबरप्लेट नसलेली स्प्लेंडर दुचाकी मिळून आली. तसेच, गोव्याहून आलेले मनीष दिलीप फर्नांडिस (वय २६) आणि चंदरेश्वर चारी (वय २१) यांच्याकडे प्रत्येकी १० हजार रुपये रोख व मोबाईल फोन सापडले. त्यांच्याकडील केटीएम दुचाकीही पोलिसांनी जप्त केली. चौकशीदरम्यान आकाश मोरे याने ही पिस्तुले मध्य प्रदेशमधून विकत घेतल्याची कबुली दिली.
या प्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप मोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाघोली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





