माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांची घरवापसी; शरद पवार यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

Suryakanta Patil | माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत सूर्यकांता पाटील यांनी घरवापसी केली आहे. यावेळी सूर्यकांता भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
तुम्ही वाट चुकलेल्या कोकराला पुन्हा जवळ घेतलं असल्याचे म्हणत त्यांनी पक्षासाठी कोणतेही काम करण्याची तयारी दाखवली. तसेच पुन्हा एकदा पक्षात प्रवेश दिल्याने शरद पवार यांचे आभार मानले. सूर्यकांता यांनी 2014 साली राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी 10 वर्षानंतर घरवापसी केली आहे.
सूर्यकांता पाटील झाल्या भावूक Suryakanta Patil |
पक्षप्रवेशावेळी पाटील म्हणाल्या की, “मी रागामुळे पक्षातून बाहेर पडले होते. मात्र तिथं जाऊन मी १० वर्षांत काहीही केलं नाही. फक्त घरात बसून होते. कधीही कोणाला मत देण्याचं आवाहनही केलं नाही. साहेबांनी पुकारलेलं हे युद्ध ते जिंकणार आहेत, हे सांगायला माझ्यासारख्या व्यक्तीची आवश्कयता नाही. मात्र ज्या घरातील मुलं आमच्यासारखी पळून जातात, त्या घरातल्या बापाला शेवटपर्यंत कष्ट करावे लागतात. मात्र आता मी पुन्हा तुमच्यासोबत काम करायचं ठरवलं आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, “तुम्ही वाट चुकलेल्या कोकराला पुन्हा जवळ घेतलं आहे. माझ्यासाठी कोणतंही काम छोटं किंवा मोठं नाही. मला पुन्हा पक्षात प्रवेश दिल्याबद्दल आभार मानते. साहेब तुम्ही आणि जयंतराव सांगतील ते काम करेन, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, सूर्यकांता पाटील या भाजपमध्ये हदगाव विधानसभा संयोजक म्हणून काम पाहत होत्या. मात्र त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहीत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह इतर पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर त्यांनी जाहीररित्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
कोण आहेत सूर्यकांता पाटील?
1974 – नांदेड काँग्रेस नांदेड पलिकेसाठी उमेदवारी (8 वर्ष नगरसेविका)
1980 – हदगाव विधानसभेमधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकल्या.
1986 – राजीव गांधी यांनी त्यांना राज्यसभेवर घेतले.
1991 – नांदेड लोकसभा काँग्रेसकडून 1लाख 37 हजार विक्रमी मतांनी विजयी.
1996 – काँग्रेसकडून हिंगोली लोकसभा निवडणूक लढली आणि विजयी झाले .
1999 – राष्ट्रवादीत प्रवेश केला.
1999 – राष्ट्रवादीकडून हिंगोली लोकसभा लढवली, विजयी झाल्या.
2004 – राष्ट्रवादीकडून लोकसभा सदस्य.
2009 – राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीत पराभव झाला.
2014 – साली काँग्रेसने राजीव सातव यांना उमेदवारी दिल्याने, त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.





