बँकॉक : थायलंडच्या माजी महाराणी सिरीकिट यांचे आज आजारपणामुळे निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या. थायलंडच्या पंतप्रधान कार्यालयाच्या सरकारी जनसंपर्क विभागाच्या कार्यालयाने आज ही माहिती दिली. माजी महाराणी सिरीकिट या रक्ताच्या संसर्गामुळे आजारी होत्या. वैद्यकीय पथकाने सर्वोत्तम उपचार केल्यानंतर देखील महाराणी सिरीकिट यांची प्रकृती शुक्रवारपर्यंत सातत्याने ढासळत गेली. शुक्रवारी संध्याकाळी साडे ९ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले, थायी रेडक्रॉस सोसायटीच्या चुलालोंगकॉर्न हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. महाराणी सिरीकिट यांचा जन्म १२ ऑगस्ट १९३२ रोजी झाला होता. त्यांचा वाढदिवस थायलंडमध्ये मदर्स डे म्हणून साजरा करण्यात आला होता. या दिवशी राष्ट्रीय सुटी दिली गेली होती. राजे भुमीबोल यांच्याशी त्यांचा विवाह वयाच्या १८ व्या वर्षी झाला. भुमीबोल हे नंतर चक्री राजघराण्याचे राजे झाले आणि त्यांनी रामा नववे असे नाव धारण केले होते. जगातील सर्वाधिक काळ महाराणीपद भुषवणाऱ्या राणी म्हणून त्यांची ख्याती होती. राजे भूमीबोल हे सर्वाधिक काळ राजेपद भूषवणारे राजे होते. त्यांचे निधन २०१६ साली झाल्यानंतर या दाम्पत्याचे पुत्र माहा वजिरालोंगकॉर्न हे राजे झाले होते. महाराणींना २०१२ मध्ये पक्षाघात झाला. तेंव्हापासून त्या सार्वजनिक कार्यक्रमात क्वचितच दिसल्या होत्या. बौद्ध गटांना आणि दक्षिण थायलंडमधील संघटनांना त्या सहाय्य करत असत. थाई हस्तमागांना त्या नेहमी प्रोत्साहन देत असत आणि ग्रामीण महिलांनी तयार केलेली लोकरीची उत्पादने विक्री करता यावीत, यासाठी त्यांनी सपोर्ट फौंडेशनची स्थापना केली होती. अभिजात जाण आणि फॅशनच्या कलासक्ततेमुळे जगभरातील सर्वात स्टायलिश व्यक्तींच्या यादीमध्ये त्या अव्वल राहिल्या होत्या. थायलंडच्या राज्यघटनेनुसार राजघराण्याचा राजकारणाशी थेट कोणताही संबंध नसला, तरी राजघराण्याचा राजकारणावर प्रभाव मात्र निश्चितच असतो. महाराणी सिरीकिट यांच्या पश्चात ३ कन्या, एक मुलगा आणि बहिण बुसबा कितियाकारा साथानापोंग असा परिवार आहे.