RSSच्या विजयादशमी उत्सवाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुख्य अतिथी; यामागे काय आहे जातीय समीकरण?
Ram Nath Kovind | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शताब्दी वर्षातील विजयादशमीच्या उत्सावासाठी मुख्य पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. संघाचा शताब्दी वर्षातील ऐतिहासिक विजयादशमी सोहळा २ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:४० वाजता नागपूरच्या रेशमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यावेळी आपले भाषणही देणार आहेत.
विशेष म्हणजे संघाच्या सार्वजनिक कार्यक्रमात येणारे कोविंद दुसरे माजी राष्ट्रपती ठरणार आहेत. यापूर्वी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे तृतीय वर्ष वर्गाच्या समारोपप्रसंगी 2018 साली नागपुरात संघस्थानी पोहोचले होते. मात्र यंदा रामनाथ कोविंद यांना आमंत्रण देण्यामागे काही कारणे असण्याची शक्यता आहे. कोणती ते पाहुयात…
रामनाथ कोविंद यांना आमंत्रण देण्यामागे काही कारणे
सध्या जाती आणि प्रतिनिधित्वाचे प्रश्न राष्ट्रीय चर्चेत महत्त्वाचे ठरत आहेत. अशा वेळी कोविंद यांची मुख्य पाहुणे म्हणून केलेली निवड राजकीय आणि सामाजिक महत्त्व दर्शवते. कारण रामनाथ कोविंद हे दलित समाजातून आलेले कै. के. आर. नारायणन यांच्यानंतरचे दुसरे राष्ट्रपती बनले आहेत.
दुसरीकडे, संघावर ब्राह्मणवादी म्हणून आरोप केला जात आहे. म्हणजेच ते उच्च जातींची बाजू घेतात. परंतु गेल्या काही वर्षांत आरएसएसने आपल्या सामाजिक समरसता अभियानाद्वारे, म्हणजेच सर्व जातींमध्ये समानता आणि एकता वाढवण्याच्या प्रयत्नांद्वारे, स्वतःला एक समावेशक संघटना म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. कोविंद यांची निवड हे या प्रवासाचे प्रतीक मानले जात आहे. त्यातून जातींच्या पलीकडे असलेला हिंदू एकतेचा दृष्टिकोन दिसून येत असल्याचे म्हटले जात आहे. Ram Nath Kovind |
गेल्या काही वर्षांत कोण होते मुख्य पाहुणे?
2024 मध्ये, आरएसएसने माजी इस्रो प्रमुख के. राधाकृष्णन यांना ‘विजयादशमी’ समारंभासाठी मुख्य पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. राधाकृष्णन यांनी पहिल्याच प्रयत्नात भारताला मंगळ ग्रहापर्यंत पोहोचवले होते. त्यांचे पूर्ण नाव डॉ. कोप्पिल्लील राधाकृष्णन आहे. ते प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ आहेत. राधाकृष्णन यांचा जन्म २९ ऑगस्ट १९४९ रोजी केरळमधील इरिंजालकुडा येथे झाला होता. Ram Nath Kovind |
पहिल्यांदाच महिलेची केली होती मुख्य पाहुणे म्हणून निवड
2023 मध्ये, आरएसएसने या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध गायक आणि संगीतकार तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित शंकर महादेवन यांना मुख्य पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. तर, 2022 मध्ये विजयादशमी उत्सवात माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणाऱ्या पद्मश्री संतोष यादव यांना मुख्य पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. संतोष यादव या दोनदा माउंट एव्हरेस्टवर चढणाऱ्या पहिल्या महिला पर्वतारोही आहेत. हा पहिलाच प्रसंग होता जेव्हा या कार्यक्रमासाठी एका महिलेला मुख्य पाहुणे म्हणून निवडले गेले होते.
संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसांची अखिल भारतीय बैठक दरवर्षी आयोजित केली जाते. यंदा 5, 6, 7 सप्टेंबर 2025 रोजी राजस्थानमधील जोधपूर येथे संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ही बैठक सप्टेंबर 2024 मध्ये केरळमधील पलक्कड येथे झाली होती. या अखिल भारतीय महासभेत संघाने प्रेरित होऊन 32 वेगवेगळ्या संघटनांचे निवडक पदाधिकारी सहभागी होतात. या तीन दिवसांच्या बैठकीत, सर्व संघटना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनुभवाच्या आधारे परिस्थितीचे मूल्यांकन सादर करतात. Ram Nath Kovind |
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) स्थापना –
विजयादशमीच्याच दिवशी नागपुरातील मोहिते वाड्यात १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) स्थापना झाली होती. त्यामुळे दरवर्षी विजयादशमीला संघाचे स्वयंसेवक देशभरात पथसंचलनांचे आयोजन करतात. Ram Nath Kovind |
हेही वाचा:
तृणमूलच्या ‘या’ आमदाराच्या घरी ईडीचे छापे ; शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी कारवाई





