Bachchu Kadu : भेंडा येथे सोमवारी प्रहारचे माजी आमदार बच्चू कडूंची जाहीर सभा

नेवासे : शेतकरी – कामगार आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या “सातबारा कोरा” यात्रेला राज्यभरातून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेचा पुढील टप्पा सोमवार (दि.२९) रोजी भेंडा येथे सायंकाळी ८ वाजता नागेबाबा भक्त निवास हॉलमध्ये होणाऱ्या जाहीर सभेत पार पडणार आहे.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा हा सभेचा मुख्य मुद्दा
या जाहीर सभेत बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा प्रश्न पुन्हा एकदा जोरदारपणे मांडणार आहेत. त्यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते की, शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कोरे नोंदवही असावी म्हणजे त्यांच्यावर कोणतेही कर्ज नसावे खरी स्वातंत्र्याची चव शेतकऱ्यांना तेव्हाच मिळेल, या संकल्पनेसाठीच त्यांनी आता संपूर्ण राज्यात सातबारा कोरा यात्रा काढलेली असून शेतकऱ्यांमध्ये या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
दिव्यांग, मच्छीमार, मेंढपाळ तरुण आणि सामान्य जनतेच्या मागण्या
सभेत केवळ शेतकऱ्यांचेच नव्हे तर दिव्यांगांच्या वेतन वाढीचे, शैक्षणिक सवलतींचे तसेच बेरोजगार तरुणांच्या संधींबाबतचे प्रश्नही मांडले जाणार आहेत. याशिवाय सामान्य जनतेच्या दैनंदिन अडचणींवरही प्रहार पक्ष आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.
पोलिस प्रशासन सज्ज
सभेसाठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन नेवासा पोलिस प्रशासनाने विशेष सुरक्षा व्यवस्था आखली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग व भेंडा शहरातील महत्त्वाच्या चौकांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
सभेचे महत्त्व काय?
राज्यातील शेतकरी व जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी बच्चू कडू यांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे या सभेतून सरकारवर दबाव आणला जाण्याची शक्यता वर्तवली जात असून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष या सभेकडे लागले आहे. या सभेसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी, दिव्यांग, मच्छीमार तसेच भेंडा व परिसरातील नागरिकांच्यावतीने करण्यात आले आहे.




